शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
प्रस्तावित असलेला टेंभुर्णी- लातूर देवणी जाणारा हायवे रस्ता साकोळ मध्यम प्रकल्पाच्या पायथ्याजवळून न जाता तो सरळ तळेगाव-साकोळ मार्गे तिपराळ देवणी मार्गे जावा यासाठी साकोळ ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पक्षीय बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून टेंभुर्णी- लातूर बाभळगाव बोरी मार्गे शिरूर अनंतपाळ, तळेगाव, तिपराळ मार्गे देवणी जाणारा हायवे हा तळेगाव साकोळ मध्यम प्रकल्पाच्या बाजूने तिपराळ जाण्याऐवजी तो हायवे तळेगाव साकोळ मार्गे तिपराळ देवणी जावा या मागणीसाठी साकोळ ग्रामपंचायत कार्यालयांकडून अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत पण शासन दरबारी याची कोणीही दखल घेत नसल्यामुळे गुरुवारी साकोळ येथील ग्रामपंचायत कार्यालयांकडून सर्व पक्षीय कार्यकर्त्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक एकत्र येऊन बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाच्या विरोधात तीव्र धरणे आंदोलन, रास्ता रोको, आमरण उपोषण करणार असल्याचे संरपच कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील यांनी बैठकीत बोलतांना सांगितले.
यावेळी बैठकीला गावातील प्रतिष्ठीत नागरिक चेअरमन कल्याणराव बर्गे, व्हाईस चेअरमन राजेंद्र साकोळे, माजी सरपंच अब्दुलअजीज मुल्ला, ग्रा.पं. सदस्य नवनाथ डोंगरे, शिवशंकर दामा, मधुकर कांबळे, सतिश मादळे, गोंिवंद हुले, अनंत शिंदे, रमेश लुल्ले, रमेश होनमाळे, आविनाश शिंदे, मनोज वाघमारे, सचिन माळी, आदींसह विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य, तसेच ग्रामपंचायत सदस्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.