नागपूर : प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही नेते आणि उमेदवार पराभूत झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या विरोधात असलेले वातावरण बघून अनेकांनी तुतारी हाती घेतली होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्रच बदलत अनेकांनी पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात वापसी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता. ते आता पुन्हा अजित पवार यांच्यासोबत काम करताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या सदस्य व प्रदेश सचिव आभा पांडे यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली होती. त्या पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय नागपूर जिल्ह्यातील अनेकांना नोटीस धाडण्यात आल्या होत्या. निलंबनाचे पत्र दिले होते. तेसुद्धा मागे घेण्यात आले असल्याचे समजते.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला एकही मतदारसंघ सोडण्यात आला नव्हता. या उलट महाविकास आघाडीत राहून शरद पवार यांनी वर्धा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. एवेढच नव्हे तर काँग्रेसमधून अमर काळे यांना आयात करून त्यांना विजयीसुद्धा केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असलेले पदाधिका-यांमसोर मोठा पेच निर्माण झाला होता.
नागपूर जिल्ह्यात अजित पवार यांनी एकाही मतदारसंघावर दावा केला नाही. काटोल-नरखेड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असतानाही आग्रह धरला नव्हता.
त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी नाराज होते. नागपूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा असल्याने भविष्यातही काहीच मिळणार नाही असेच अनेकांना वाटत होते. काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वर्चस्व होते. शरद पवार आणि सतीश शिंदे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. शिंदे अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी शिंदे यांना मुंबईत बोलावून घेतले व परत पक्षात येण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे शिंदे यांचाही नाईलाज झाला होता. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख पराभूत होताच ते परत दादांच्या गटात परतले आहेत. आभा पांडे यांनी आधीच बंडखोरी करणार असल्याचे सांगून टाकले होते. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी महायुतीचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढली. त्या पराभूत झाल्या आहेत. मात्र, त्यांनी अजित पवार व पक्षापासून फारकत घेतली नाही. मध्य नागपूरमध्ये हलबा समाजाच्या पदाधिका-यांनी महायुतीच्या विरोधात काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना निलंबनाच्या नोटीस पाठवल्या होत्या. या नोटीस फक्त कागदोपत्री ठरल्या आहेत. पुन्हा महायुतीची सत्ता आल्याने अनेकांनी अजित पवार यांनाच आता नेते मानले असल्याचे दिसून येते.