33.1 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रसामूहिक कॉपी प्रकरणी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द; गुन्हे नोंद होणार

सामूहिक कॉपी प्रकरणी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द; गुन्हे नोंद होणार

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
ओव्हर परिसरातील राजर्षि शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील सामूहिक कॉपी प्रकरणानंतर परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे.

त्याशिवाय केंद्रातील संचालक, पर्यवेक्षकांसह संपूर्ण स्टाफही बदलला आहे तसेच संचालक, पर्यवेक्षकांच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी अधिका-याची नियुक्ती केल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.

राजर्षि शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षेतील जीवशास्त्र विषयाच्या पेपरला केंद्राला तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या भरारी पथकाने गुरुवारी (दि.२७) भेट दिली तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते. त्याविषयीचा सविस्तर अहवाल तहसीलदारांनी शिक्षणाधिका-यांना दिला होता. त्यावर शिक्षणाधिका-यांनी गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे व विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे यांना वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या.

हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी लाठकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार सदर केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला, सामूहिक कॉपी आहे किंवा कसे याबाबत विभागीय मंडळाला पत्र देण्यात आले तसेच केंद्रावरील सर्व कर्मचा-यांच्या नियुक्त्या रद्द करून इतरांच्या नियुक्त्या केल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दिली.

हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार
केंद्र संचालक जी. जे. जाधव यांनी परीक्षा संचलनात कर्तव्यात कसूर केली. नियमानुसार परीक्षा संचालन केले नाही. अभिलेखे अद्ययावत ठेवले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्याशिवाय एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी होते. त्या हॉलवरील सर्व पाच पर्यवेक्षकांच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्यामध्ये व्ही. यू. वैद्य, पी. जी. गवळी, पी. बी. महाडिक, सय्यद सरवर, वाय. एम. राठोड यांचा समावेश असल्याचेही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR