18.6 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeसंपादकीयसारे जहाँ से अच्छा...!

सारे जहाँ से अच्छा…!

दबाव नावाचा राक्षस मैदानावर अघटित घडवतो. त्याचा प्रत्यय जॉर्जटाऊन, बार्बाडोसमधील किंग्जटन ओव्हल स्टेडियमवर आला. टी-२० विश्वकप उंचावण्यासाठी चोकर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या द. आफ्रिका आणि या बाबतीत दुस-या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघात भिडंत होती. परंतु मोक्याच्या क्षणी हात-पाय गाळण्यात आम्ही नंबर वन आहोत हे द. आफ्रिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले. टी-२० स्पर्धेच्या इतिहासात साखळी स्पर्धेत एकही सामना न गमावणारे दोन हेविवेट संघ अंतिम सामन्यात एकमेकाविरुद्ध भिडले होते. टीम इंडियाने साखळीतील सारे सामने निर्विवादरीत्या जिंकले होते तर द. आफ्रिकेला केवळ दैव बलवत्तर होते म्हणून काही सामन्यांत विजय मिळाला होता. अंतिम सामन्यातही त्यांच्या ‘गॉड’ने त्यांना साथ दिली होती परंतु शेवटच्या पाच षटकांत त्यांच्यावर पुन्हा एकदा दैव हसले! विजयाचा एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यासाठी मार्करमच्या संघाची ३० चेंडूत ३० धावांची गरज आणि सहा विकेटस् शिल्लक अशी उत्तम स्थिती होती.

त्या स्थितीत फक्त एकच संघ जिंकू शकला असता, तो म्हणजे द. आफ्रिका. भारतीय संघावरही फार मोठे दडपण होते परंतु त्यांनी मोठ्या शौर्याने दबाव झेलला. शेवटचा चेंडू पडेपर्यंत हार मानायची नसते, जिद्द सोडायची नसते हे बाळकडू प्यालेल्या रोहित शर्माच्या संघाने बघता बघता द. आफ्रिकन संघाला पराभवाच्या खाईत ढकलले. शेवटच्या पाच षटकांतील दोन षटकांत जसप्रित बुमराने फक्त चार धावा दिल्या. उर्वरित तीन षटके अर्शदीप आणि हार्दिक पांड्याने मोठ्या धाडसाने टाकली. सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर ‘किलर’ मिलरचा कॅच पकडताना दाखवलेली हरणाची चपळाई नाट्यमय ठरली. ‘सारे काही संपले’ अशा स्थितीत, विपरीत परिस्थितीत भारताने ७ धावांनी अफलातून विजय मिळवला. विजयश्रीला अक्षरश: पराभवाच्या जबड्यातून बाहेर खेचले. १७ वर्षांनंतर दुस-यांदा भारतीय संघाने टी-२० विश्वचषक उंचावला. चॅम्पियन संघ दबावाला जुमानत नाही उलट ‘होनी को अनहोनी’ करण्याची त्याच्यात हिम्मत असते हे रोहित शर्माच्या संघाने दाखवून दिले. अर्थात त्यामागे संघाची तीन वर्षांची मेहनत, राहुल द्रविडचे मार्गदर्शन कारणीभूत आहे.

रोहित शर्माचे शानदार नेतृत्व, त्याला त्याच्या सहका-यांनी दिलेली साथ, गोलंदाजांची अप्रतिम गोलंदाजी, शानदार क्षेत्ररक्षण या गोष्टी विजयाचे गमक ठरल्या. थरारक विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या आणि दीडशे कोटी भारतीयांच्या आनंदाश्रूंना पारावार उरला नाही. प्रत्येक भारतीयाच्या मनात ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तां हमारा’हीच भावना होती. सामन्याचे समालोचन करणा-या समालोचकांनाही आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत. खेळाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना कशी जोपासली जाते याचे नेत्रदीपक दर्शन किंग्जटन ओव्हलवर घडले. या स्पर्धेत भारतीय संघाने एकजुटीच्या बळावर आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. बेधडक खेळ, जिंकण्याची जिद्द असेल तर यशस्वी होता येते हे भारतीय संघाने सप्रमाण सिद्ध केले आहे. या स्पर्धेत विराट कोहली वारंवार अपयशी ठरत होता परंतु अंतिम सामन्यात त्याने ७६ धावांचे योगदान दिले आणि त्यावर भारताची १७६ धावांची इमारत उभी राहिली. फलंदाजीत प्रत्येक भारतीय खेळाडूने आपले योगदान दिले. संघ अडचणीत सापडल्यानंतर कोणी ना कोणी धावून यायचा. स्पर्धेतील प्र्रत्येक सामन्यात प्रत्येक खेळाडूने आपापला वाटा उचलला.

फलंदाज सामने जिंकून देतात तर गोलंदाज स्पर्धा जिंकून देतात असे म्हटले जाते ते खोटे नाही. या स्पर्धेत ख-या अर्थाने भारतीय गोलंदाजीच मारक ठरली. कारण फलंदाजांनी जी धावसंख्या दिली तिचा बचाव गोलंदाजांनीच केला. बुमरा, अर्शदीप, हार्दिकचा मध्यमगती मारा आणि कुलदीप, अक्षर यांच्या फिरकी मा-याने भारताला अनेक विजय मिळवून दिले. यात सरस गोलंदाज ठरला तो बुमरा. त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी खेळूच शकले नाहीत. बुमराने स्पर्धेत १७८ चेंडू टाकले, त्यातील ११० चेंडू निर्धाव होते. म्हणजे षटकामागे त्याने सरासरी फक्त ४ धावा दिल्या. अंतिम सामन्यात त्याने चार षटकांत १४ निर्धाव चेंडू टाकले. स्पर्धेत १५ बळी घेणारा बुमरा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. अंतिम सामन्यात ७६ धावा काढणारा विराट सामनावीर ठरला. भारताच्या ७ बाद १७६ धावसंख्येचा पाठलाग करताना द. आफ्रिकेला ८ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. सामनावीरचा पुरस्कार स्वीकारताना विराटने आपण टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले तर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने आपली निवृत्ती जाहीर केली.

कोच राहुल द्रविड यांचीही ही अखेरची स्पर्धा होती. रोहित-विराटच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला असे म्हणावे लागेल. मोठे फटके चाहेल तेथे मारण्यात रोहित पटाईत होता तर आपल्या खेळात सातत्य ठेवत परिस्थितीनुसार खेळ करण्यात विराट माहिर होता. या दोघांनीही आता विजयाचा बॅटन तरुणाईच्या हातात दिला आहे. आता युवा क्रिकेटपटूंना त्यांचा वारसा पुढे चालवावा लागेल. अंतिम सामना कोच राहुल द्रविडसाठी अखेरचा सामना होता. द्रविडने प्रशिक्षक म्हणून भारताला दोन विश्वचषक जिंकून दिले आहेत. २०१८ मध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. २९ जूनला बार्बाडोसमध्ये त्याने भारताला दुसरा टी-२० विश्वचषक दिला आहे. नेहमी शांत राहणा-या द्रविडने टी-२० विश्वचषक उंचावताना एखाद्या लहान मुलासारखे ओरडत सेलिब्रेशन केले. विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीयांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू आणि रोहित-विराट-द्रविड निवृत्त होत असल्याने दुस-या डोळ्यात दु:खाश्रू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR