मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण, लाडका भाऊ या सा-या योजना लाडक्या खुर्चीसाठी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात या योजनांचे श्रेय लाटण्यासाठी स्पर्धा लागली आहे. हे सर्व भाऊ लबाड असल्याचा आरोप करून शिवसेनेचे (यूबीटी) पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या भाऊ-बहिणी निवडणुकीत तिघांना आपला भाऊ मानणार नाहीत, असा दावा केला.
पूर्व विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भास्कर जाधव नागपूरमध्ये आले आहेत. त्यावेळी त्यांनी मी जागा वाटप समितीमध्ये नसल्याने त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र रामटेक लोकसभा आमची जागा असताना आम्ही मोठ्या मनाने काँग्रेससाठी सोडली. त्या बदल्यात आम्हाला नागपूर जिल्ह्यातील पाच जागा मिळाव्या अशी अपेक्षा आहे.
रामटेक, हिंगणा, कामठी, उमरेड, नागपूर शहरातील पूर्व आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाची आम्ही मागणी केली आहे. चर्चेतून हे मतदारसंघ आपल्याकडे घेऊ, असे जाधव म्हणाले.
पूर्व विदर्भात युवा शिवसैनिक आमच्याकडे आहेत. म्हणून ८ ते १० जागा मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वी युतीमध्ये असताना शिवसेनेने विदर्भातील २८ जागा लढल्या होत्या. त्यापैकी १४ मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. त्या सोडून आठ ते दहा मतदारसंघ आम्हाला परत मिळावेत अशी मागणी असल्याचे जाधव यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांना टोला
प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या जागा वाटपावरून टीका केली होती. त्याला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही प्रकाश आंबेडकरांना जागा वाटपाचे काम दिले नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षावर बोलणे टाळावे. त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी, जागा वाटप करावे. आम्ही आमचे बघू, असा टोला प्रकाश आंबेडकरांना भास्कर जाधव यांनी लगावला.