27.6 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्रसाळवींनी सांगितले ठाकरेंची साथ सोडण्याचे कारण

साळवींनी सांगितले ठाकरेंची साथ सोडण्याचे कारण

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. अशातच त्यांनी बुधवारी (१२ फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची साथ सोडली. यानंतर आज (१३ फेब्रुवारी) ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाआधी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना राजन साळवी म्हणाले की, गेली ३८ वर्षे मी रत्नागिरीमध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक आहे. त्यामुळे २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. कारण या निवडणुकीत माझ्या पक्षातील नेत्यांनीच माझ्याविरुद्ध काम केले. खरं तर विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. कारण विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केले, असा गंभीर आरोप राजन साळवी यांनी केला आहे. त्यामुळे आता राजन साळवी यांच्या आरोपावर विनायक राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

सामंत बंधूंविरोधातील वादावर बोलताना राजन साळवी म्हणाले की, त्यांच्याबरोबर आता माझी समेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना समजावून सांगितले की, शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. त्यामुळे आता आमच्यातील वाद मिटले आहेत. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर, मला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, असे मी आधीच बोललो होतो. त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे, असे राजन साळवी यांनी स्पष्ट केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईसंदर्भात बोलताना राजन साळवी म्हणाले की, कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही. तेव्हाही मी घाबरलो नाही आणि आताही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेन. कारण मला खात्री आहे मी निर्दोष आहे. तसेच जेव्हा निवडणुका होत असतात तेव्हा आरोप होत असतात, असेही राजन साळवी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR