20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeधाराशिवसावंत साहेब ‘अब तुम्हारी बारी’ लोकसभेतील वचपा विधानसभेत काढणार?

सावंत साहेब ‘अब तुम्हारी बारी’ लोकसभेतील वचपा विधानसभेत काढणार?

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी हे घटक पक्ष हिसका दाखवण्याच्या तयारीत

धाराशिव : मच्छिंद्र कदम
धाराशिव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या माझ्या भगिनींसाठी छातीचा कोट करून लढणार आणि विक्रमी मताने विजयी करणार असे जाहीर सभेत सांगितले होते. वास्तव मात्र धाराशिव लोकसभेची जागा स्वत:च्या पक्षाला मिळावी, तीही आपल्या घरातीलच उमेदवार राहावा, यासाठी त्यांनी जीवाचे रान केले होते.

प्रत्यक्षात मात्र त्यांना लोकसभेची ही जागा मिळू शकली नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला ही जागा सुटली. नाराज सावंतांनी पक्षाच्या दबावापोटी अर्चना पाटील यांना मताधिक्य देऊन विजयी करू असा निर्धार केला. परंतु प्रत्यक्षात त्यांच्याच असलेल्या भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना तब्बल ८१ हजार मतांची पिछाडी मिळाली. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक सुरु असून सावंत हे उमेदवार आहेत.

त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता सावंत साहेब अब तुम्हारी बारी असे म्हणत लोकसभेतील वचपा काढण्याच्या तयारीत आहेत. तशीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांमध्ये आहे. मागील सत्ता काळात सावंतांनी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना सत्तेतील निधीचा वाटा दिलेला नाही, विश्वासात घेतले नाही. काही ठराविक व मर्जीतील लोकांना सोबत घेऊन निधी वाटप केला. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सावंतांच्या विरोधात काम करण्याच्या तयारीत आहेत. स्टेजवर आम्ही दिसलो तरी प्रत्यक्षात मतदान रुपी ते अवतरणार का? असा भूम परंडा वाशी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी हजारो कोटींचा निधी आपल्या मतदारसंघात आणला. त्यामुळे त्यांना येथील जनता भरभरून मतदान करेल असा त्यांना विश्वास आहे. मात्र सावंत यांनी काही केलेल्या वक्तव्यामुळे येथील जनता नाराज आहे. ज्या कै. ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांना या मतदारसंघात स्वत:चे तिकीट नाकारून संधी दिली.

त्याच ज्ञानेश्वर पाटील यांच्याबद्दल सावंत यांनी केलेले वक्तव्य हे या मतदारसंघातील जनता विसरू शकली नाही. याच वाक्याचा मतदारसंघात सावंत विरोधात मोठा रोष आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला भिकारी करेन हेही त्यांचे वाक्य राज्यभर गाजले, एवढेच की काय त्यात आणखी भर म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबाबत असलेल्या पदाधिका-यांसोबत बसायचे म्हणले की, माझ्या उलट्या झाल्यासारखे होते. परंतु नाईलाजाने बसावे लागते, या वाक्याने तर घटक पक्षातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवण्याच्या तयारीत आहेत.

त्यामुळे या मतदारसंघात सावंत यांना विकासाच्या जोरावर मते मिळतील असा विश्वास असला तरी स्थानिक जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे या निवडणुकीत लाखोंच्या मताने विजयी होणार हा सावंत यांचा आत्मविश्वास किती खरा ठरणार हे येणा-या काही दिवसात स्पष्ट होणार आह. सध्या मात्र या मतदारसंघातील मतदार त्याचबरोबर घटक पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादी या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची चर्चा या मतदारसंघात रंगू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR