मुंबई : ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणारे मुसलमान होते म्हणून ‘छावा’ पहाच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, पण सावित्रीबाई फुले यांचा निर्घृण छळ करणारे आपलेच सनातनी हिंदू होते म्हणून त्यांना पाठीशी घालायचे? हा न्याय नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.
जोतिबांच्या जीवनाविषयी विचार करताना सावित्रीबाई फुले यांचा विचार वेगळा किंवा दूर काढता येणार नाही. स्त्री शिक्षणाचा पाया फुले दाम्पत्याने घातला. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची शाळा सर्व प्रकारच्या विरोधाला तोंड देऊन स्थापन केली. त्यामुळे स्त्री शिक्षणाच्या चळवळीने जोर पकडला. सावित्रीबाई त्या शाळेत स्वत: शिकवत आणि त्या शाळेत जात तेव्हा त्यांच्या अंगावर चिखल, शेण, कचरा फेकून अडवले जात होते. सावित्रीबाईंनी हा भयंकर छळ सहन केला आणि तो चित्रपटाच्या पडद्यावर दाखवला म्हणून छाती का पिटता? असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला आहे.
फुले दाम्पत्याने काय काम केले? त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. अस्पृश्यांसाठी शाळा काढणारे फुले हे भारतातील पहिले समाजसुधारक होते. ब्राह्मण समाजातील कित्येक बालविधवा अजाणतेपणाने गरोदर झाल्या तर त्या आत्महत्या तरी करीत नाहीतर गर्भपात करीत. त्या बालविधवांसाठी फुले दाम्पत्याने स्वत:च्या घरात प्रसूतिगृह आणि बालहत्या प्रतिबंधकगृह काढले. सर्व समाजाचा विरोध पत्करून फुले दाम्पत्याने ही सामाजिक सुधारणांची कामे केली, असे उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.
फुले हे ब्राह्मणविरोधी नव्हते आणि ब्राह्मण हेदेखील फुले यांच्या विरोधात नव्हते. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तात्यासाहेब भिडे हे ब्राह्मण गृहस्थ होते, पण फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याने ते प्रभावित झाले आणि आपला भिडे वाडा त्यांनी फुले यांच्या हवाली केला. फुले यांनी जातिभेद मानला नाही. हिंदू समाजातील जातिभेद आणि अस्पृश्यता नाहीशी व्हावी, सामाजिक समतेवर आणि न्यायावर समाजाची उभारणी व्हावी तसेच सर्वांनी सत्याचे उपासक व्हावे यासाठी महात्मा फुले यांनी जिवाचे रान केले, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.