पनवेल : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पेठाली गावातील सोनम केणी या तरुणीला घर बांधकामासाठी २० लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आला. सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
२०१८ साली पनवेलमधील पेणधर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक केणी याच्यासोबत विवाह झाला होता. २०२० साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच व्हावा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत, भोंदूबाबा, डॉक्टरची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला. मात्र २०२४ साली दुसरी देखील मुलगी झाल्याने सासरच्यांनी टोमणे मारत छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली.
दुस-या मुलीचा दोनच महिन्यांत पाळण्यातच संशयास्पद मृत्यू देखील झाला. यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यांनी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला. सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमने आपल्या बहिणीकडे केली होती. वारंवार पैशाची मागणी, टोमणे मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवशीच सोनमने आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करून स्वत: देखील आत्महत्या केली.