-मुख्यमंत्र्यांचे आवाहन, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : विनायक कुलकर्णी
मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत कुठल्याही साहित्यसंस्थेत राजकीय हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला साहित्यात राजकीय हस्तक्षेप करायचा नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावे, परंतु साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यिकांना काढला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी भाषा सक्तीची आहे. इतर कुठलीही भाषा सक्तीची नसल्याची भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री आणि स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका डॉ. मृदुला गर्ग, मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोक कुपर, साहित्य महामंडळाचे प्रमुख विश्वस्त प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत तसेच महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी माय मराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकौतुक नको,भाषेला विरोध नाही. परंतु सक्तीला विरोध आहे, अशी भूमिका मांडली. तो धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मुद्यांचा परामर्श घेताना महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच राहिल, असे स्पष्ट केले. मराठी भाषा वगळता अन्य कुठल्याही भाषेची सक्ती नाही. त्रिभाषा सूत्रानुसार आणखी कोणती भाषा समाविष्ट करावी, याविषयी विचार सुरू आहे. कोणत्या वर्गापासून भाषा शिकवायची याचा विचार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली असून या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आलेला आहे, असे ते म्हणाले.
विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, ही वृत्ती बरोबर नाही. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे. परंतु मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे, ही ख-या अर्थाने आमच्या सरकारची भूमिका आहे. स्वभाषेचा सन्मान नक्कीच व्हायला हवा. त्याचवेळी इतर भाषांचेही स्वागत व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, आजच्या पिढीत मराठी साहित्याबाबत आवड निर्माण होत आहे. नव नवीन विषयांवर लेखन निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्याची प्रक्रिया गतिमान होत आहे. ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांनी अनेक वर्षांपासून मराठी साहित्यातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक, लेखक यांच्या साहित्याचे मनापासून वाचन केले. त्याचा प्रभाव मनावर आहे. या माध्यमातून नवीन पिढीला नवीन प्रेरणा मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मराठीला राजमान्यता मिळाली,
आता लोकमान्यता मिळवून देऊ
मराठी भाषा ही अभिजात होतीच तिला राजमान्यता देण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले. पण मराठीला अभिजात भाषा जाहीर करून थांबता येणार नाही. मराठी जी मुळातच अभिजात होती, तिला राजमान्यता मिळाली. परंतु या राजमान्यतेचा उपयोग करून मराठीला संपूर्ण देशात लोकमान्यता मिळवून द्यायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात फक्त
मराठीचीच सक्ती
भाषा सक्तीचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो की, महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी सक्तीची आहे. इतर कुठलीही भाषा सक्तीची नाही किंवा सक्तीची केली जाणार नाही, असा भाषासक्तीबाबतचा स्पष्ट निर्वाळा दिला आणि त्रिभाषा सूत्रामध्ये भारतीय भाषांमधील जी भाषा तुम्हाला शिकायची असेल ती शिका, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी संमेलनात
व्यक्त केली दिलगिरी
साता-यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे संमेलनस्थळी व्यासपीठावर उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेथूनच भाजप बंडखोरांना फोनवरून संवाद साधत मनधरणी करावी लागली. यावेळी अनेकांना फोन लावण्याची वेळ आल्याने मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन कार्यक्रमात साहित्यिकांची दिलगिरी व्यक्त केली.

