नाशिक : विशेष प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेसह विविध शासकीय विभागांकडून तयार करण्यात आलेल्या सिंहस्थ आराखड्याविषयी आढावा बैठक मंगळवारी राज्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत पार पडली. महापालिकेने सिंहस्थासाठी तयार केलेल्या १५ हजार कोटींच्या आराखड्यात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनंतर तब्बल ८,१०० कोटींची कपात करून ६,९०० कोटींवर आराखडा आणल्यानंतर आता पुन्हा ६०० कोटींची सुधारित अंदाजपत्रकीय बदलानुसार वाढ केली जाणार आहे. त्यानुसार आता हा आराखडा ७,५०० कोटींपर्यंत जाणार आहे.
आगामी कुंभमेळ्यासाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला होता. यात रिंगरोड व भूसंपादनासाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य राज्यस्तरीय यंत्रणांनाही कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकासकामे करावी लागत असल्यामुळे हा आराखडा जवळपास २३ ते २४ हजार कोटींच्या घरात जाणार होता.
अधिकाधिक निधी मागितला म्हणजे केंद्र व राज्य शासन कपात करून किमान पोट भरेल इतका निधी देईल, अशी अपेक्षा करून आराखड्यातील खर्चाचे आकडे फुगवले होते. वास्तविक सन २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेला जेमतेम १,०५२ कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला होता. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी बैठकांचे सत्र लावत महापालिकेचा १५,००० कोटींचा आराखडा ६,९०० कोटींवर आणला आहे.
थर्टी फर्स्ट महापालिकेतच
एरवी थर्टी फर्स्टला अनेक जण सहकुटुंब सहलीला जातात. महापालिकेचे काही अधिकारीही सहलीत सहभागी होतात. यंदा अधिका-यांचा थर्टी फर्स्ट मात्र आकडेमोड करण्यातच जाणार आहे. विभागाची माहिती अद्ययावत करून देणे तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पीपीटी प्रेझेंटेशन तयार करणे यासाठी अधिका-यांचा थर्टी फर्स्ट महापालिकेतच संपणार आहे.