नाशिक : प्रतिनिधी
नुकताच उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा पार पडला. उत्तर प्रदेश सरकारने विचारही केला नव्हता, त्यापेक्षा अधिक भाविक या कुंभमेळ्याकरिता प्रयागराजमध्ये गेले होते. तर आता महाराष्ट्रातील नाशकात पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मेळ्याकरिता राज्य सरकारने तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी अधिका-यांना महत्त्वाचे आदेश देऊन, तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २३ मार्च रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. २०२६ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याचमुळे आज फडणवीसांकडून याकरिता पाहणी दौरा आणि महत्त्वाच्या बैठकींसाठी हा दौरा करण्यात आला. पण नाशिकमध्ये पोहोचताच फडणवीसांनी सर्वांत प्रथम त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या ठिकाणी त्यांच्या हस्ते पूजा सुद्धा पार पडली. तसेच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे नाशिकचा विकास होणार आहे, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास होणार असून याकरिता ११०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांकडून देण्यात आली आहे.
तसेच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास करण्यात येणार आहे. तसाच त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे. देशभरातून लोक तिथे येतात. जवळपास ११०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करता येईल. त्यानंतर दुसरा टप्पा होईल. दर्शनाकरिता कॉरिडोर तयार करणे असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, शौचालयांची व्यवस्था असेल, आपली जी तिथे वेगवेगळी कुंड आहेत, त्या कुंडांचे रिस्टोरेशन, प्रमुख मंदिरांचे रिस्टोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी करणे. मागे ब्रह्मगिरी आहे, हा परिसर अतिशय सुंदर आहे. प्रशासनाला मी सांगितले त्यांनी पुढच्या तयारीला लागावे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
तर, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये ११ पूल बांधण्यात येणार आहेत. रस्त्यांचे मोठे जाळे तयार करण्यात येईल. घाट वाढवण्यात येणार आहेत, सोयीसुविधा वाढविण्यात येणार आहेत. एसटीपीचे जाळे करून पाणी शुद्ध करण्यात येईल, त्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे.