नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दोन वर्षांनी होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी नाशिकमध्ये असतानाच या तारखा जाहीर झाल्या आहेत. या सिंहस्थ मेळाव्यासंदर्भात काही मतभेद असले तरी ते सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यासाठी आज बैठक पार पडत असून त्याचदरम्यान अमृतस्नानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा हा खरा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा याबाबत त्र्यंबकेश्वरच्या शैव संप्रदायाने सवाल उपस्थित केले होते. वैष्णव आणि शैव संप्रदायातील वाद टाळण्यासाठी प्रशासनाने आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही नावं टाळून केवळ सिंहस्थ कुंभमेळा २०२७ असे संबोधन करणे सुरू केले आहे. या वादामुळे भाविकांच्या येण्यावर मोठा परिणाम झाला असता. त्यातून श्रद्धा जाण्याची भीती होती. त्यामुळे सुवर्णमध्य शोधत प्रशासनाने आता हा वाद सोडवला आहे. मात्र आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शैव साधू बैठकीत याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच कुंभमेळा नियोजना संदर्भात होणा-या बैठकीत कुंभमेळ्यामध्ये होणा-या अमृतस्नान तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर पहिले अमृतस्नान
त्र्यंबकेश्वर अमृतस्नान तारखा जाहीर झाल्या आहेत.
पहिले अमृतस्नान – २ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृतस्नान – १२ सप्टेंबर २०२७
नाशिक कुंभ अमृतस्नान तारखा
३१ ऑक्टोबर २०२६ ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात होईल.
पहिले अमृतस्नान -२ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृतस्नान – ११ सप्टेंबर २०२७
आजच्या बैठकीतील पाच महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वर्षांनी होणा-या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची बैठक घेत आहेत. यामध्ये देशातील सर्वच आखाड्यांचे साधू-महंत आणि प्रशासन अधिकारी उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये अमृतस्नानाच्या तारखा जाहीर करण्याबरोबरच नाशिकचा कुंभमेळा १३ महिन्यांऐवजी २२ महिने असणार असल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये तीन मुख्य स्नान असून २५ ऐवजी ४२ पर्वस्नान असतील. चर्चेमध्ये त्र्यंबकेश्वरमधील साधूंची नाराजी हा कळीचा मुद्दा असणार आहे. आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण पाच मुद्दे असणार आहेत.
सिंहस्थ प्राधिकरणात साधू-महंतांचा सहभाग असावा अशी मागणी.
कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्याकडून अद्याप निधी जाहीर झालेला नाही. तो जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात होणारा सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वरचा खरा की नाशिकचा याबाबत त्र्यंबकेश्वरचा असे म्हणण्याची शैव आखाड्यांची मागणी.
गोदावरी नदी प्रदूषणाबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणाबाबत साधू-महंतांची नाराजी.