22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeलातूरसिद्धेश्वर यात्रा महोत्सव चालणार २० दिवस 

सिद्धेश्वर यात्रा महोत्सव चालणार २० दिवस 

लातूर : प्रतिनिधी
लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवार दि. २६ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. २० दिवस चालणा-या या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
श्री. सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने गेल्या ७१ वर्षापासून महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ७२ वा यात्रा महोत्सव पार पडणार आहे. या यात्रा महोत्सवाचे आकर्षण केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यासह लगतच्या असलेल्या कर्नाटक राज्यातील काही भागांतही आहे. त्यामुळेच हा यात्रा महोत्सव आता भव्य, दिव्य स्वरुपात पार पडणार आहे. या यात्रा महोत्सवासाठी आवश्यक असणारी तयारी जय्यत प्रमाणात सुरु झाली असून याची देखरेख देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त करीत आहेत. यात्रा महोत्सवादरम्यान भाविकांना आणि महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंना अधिकाकाधिक सुविधा देण्याचा मानस यावर्षी प्रशासकांसह विश्वस्तांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर प्रशासनानेही आवश्यक असणारे सर्व सहकार्य देवू केलेले असून पोलिस प्रशासनाने यात्रा महोत्सवादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे.
बुधवार दि. २६ फेब्रुवारीपासून या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ होणार असून या यात्रेचा १७ मार्च रोजी समारोप होणार आहे.  तब्बल २० दिवस चालणा-या या यात्रा महोत्सवात देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात्रा महोत्सव अडथळ्याविना पार पाडण्यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. यात्रा महोत्सवात मनोरंजनासह विविध रहाट पाळणे, मौत का कुवाँ, ब्रेक डान्स, यासह लहान मुलांना आकर्षित करणारे लहान पाळण्यांचाही समावेश असणार आहे. या यात्रा महोत्सवात भाविकांसह यात्रेकरुंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान प्रशासकासह विश्वस्थांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR