मुंबई : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक काल अखेर पार पडली. या सिनेट निवडणुकीत १० पैकी १० जागा शिवसेना ठाकरे गटाने जिंकल्या. सिनेट निवडणूक ठाकरे गटाने एकहाती जिंकली. त्यानंतर आता आज ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर शिवसैनिक जमले आहेत.
शिवसैनिक ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर जल्लोष करत आहेत. युवा सेनेच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय. एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला जात आहे. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण केली जात आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. हा ‘दस का दम’ आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र, सर्वांचं अभिनंदन करतो. विजय काय असतो हे काल दाखवून दिलं आहे. करून दाखवलं आहे. ही सुरुवात आहे. असाच विजय विधानसभेत मिळवायचा आहे. सर्वांत पहिला सन्मान राजन कोळंबकर यांचा करायचा आहे. राजन यांनी निष्ठा काय असते हे दाखवून दिले आहे. मागच्या दोन्ही टर्ममध्ये ते सिनेट सदस्य होते. यावेळी त्यांना सांगितले तुम्हाला थांबावे लागेल. काही चेहरे बदलायचे आहेत. नवीन नावे द्यायची आहेत. ते म्हणाले, तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या. मी दहाच्या दहा लोकांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
आजपासूनची विजयाची सुरुवात आहे. गुलाल उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निवडणुकीला उधळायचा आहे. त्यासाठी कामाला लागा. आपल्यावर जनतेने जो विश्वास दाखवला आहे, तोच विश्वास उद्धव ठाकरेंवर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासाठी काम करणा-या सर्वांना शुभेच्छा देतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.