वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेची संसद सिनेटमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वाधिक लांबीच्या भाषणाचा विक्रम नोंदला गेला आहे. हे भाषण थोडेथोडके नव्हे तर अखंड २५ तास ५ मिनिटे इतक्या लांबीचे झाले आहे. त्यामुळे सिनेटमध्ये सर्वाधिक लांबीचे भाषण म्हणून या भाषणाने विक्रम प्रस्थापित केला आहे.
न्यू जर्सीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर कोरी बुकर यांनी सिनेटमध्ये उभे राहून हे ऐतिहासिक भाषण केले. त्यांनी या संपूर्ण भाषणात ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे काढत ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
कोरी बुकर यांनी सोमवारी संध्याकाळी ६.५९ वाजता भाषण सुरू केले आणि मंगळवारी रात्री ८.०५ वाजता ते संपवले. कोरी बुकर म्हणाले की, जोपर्यंत मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे तोपर्यंत अमेरिकन सिनेटचे नियमित कामकाज विस्कळीत करण्याचा माझा हेतू आहे. कारण मला डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचा विरोध करायचा आहे.
डेमोक्रॅटिक सहका-यांचा पाठिंबा : बुकर यांना या ऐतिहासिक भाषणादरम्यान त्यांच्या डझनभर डेमोक्रॅटिक सहका-यांनी साथ दिली. सिनेट माइनॉरिटी लीडर चक शुमर, सिनेटर ख्रिस मर्फी, एमी क्लोबुचर, मेझी हिरोनो आणि डिक डर्बिन यांनी बुकर यांच्याजवळ जाऊन त्यांनी बुकर यांच्यासोबत संवाद साधून त्यांना थोडा वेळ विश्रांती मिळेल असे पाहिले.
डेमोक्रॅटिक पक्षाचे हाउस माइनॉरिटी लीडर हकीम जेफ्रीस आणि काँग्रेस ब्लॅक कॉकसच्या सदस्यांनीही बुकर यांचे भाषण ऐकण्यासाठी सिनेट कक्षात उपस्थिती दर्शवली. बुकर यांचे चुलतभाऊ, भाऊ आणि डेमोक्रॅटिक सहाय्यक यावेळी गॅलरीत उपस्थित होते.
सिनेटच्या नियमांनुसार, एक सिनेटर सतत उभा राहूनच बोलत राहिला पाहिजे. तो सिनेट कक्षाबाहेर जाऊ शकत नाही, विश्रांती घेऊ शकत नाही किंवा शौचालयास जाऊ शकत नाही. बुकर यांनी या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. भाषणावेळी काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी भाषणाच्या काही दिवस आधी उपवास केला होता आणि भाषणाच्या आदल्या रात्रीदेखील द्रवपदार्थ पिणे थांबवले होते.
रात्रीच्या वेळी बुकर, अध्यक्षता करणारे अधिकारी, काही लिपिक आणि सुरक्षा कर्मचारी वगळता संपूर्ण सिनेट रिकामी होती. सिनेट स्टाफ आणि कॅपिटल पोलिस यांना भाषणाच्या संपूर्ण कालावधीत आपापल्या जागांवर तैनात राहावे लागले. काही डेमोक्रॅट सिनेटरांनी मधूनच प्रश्न विचारून बुकर यांना थोडा वेळ सावरायला मदत केली.
शारीरिक थकव्यावर मात : बुकर हे उभे राहून भाषण करताना वजनाचा भार पडू नये म्हणून सतत हालचाल करत होते. काहीवेळी स्टँडवर हात टेकवून त्यांनी भाषण दिले. आपल्या नोट्सच्या जाड फायलीतून ते भाषण वाचत राहिले. त्यांनी ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण, मेडिकेअरवरील संभाव्य कपात, तसेच ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांच्या सरकारी कार्यक्षमता धोरणांविषयी भाष्य केले. वांशिक न्याय, मतदान हक्क आणि आर्थिक असमानता यावरही त्यांनी भाष्य केले. विशेषत: ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचा दुर्लक्षित समुदायांवर होणा-या परिणामांवर त्यांनी भर दिला.
भाषणाचा विक्रम मोडला
यापुर्वी १९५७ मध्ये दिवंगत सिनेटर स्ट्रोम थर्मंड यांनी २४ तास १८ मिनिटांच्या फिलिबस्टरचा विक्रम मोडला. थर्मंड यांनी नागरिक हक्क विधेयक रोखण्यासाठी ते भाषण दिले होते. १९५७ मध्ये थर्मंड यांनी त्यांच्या फिलिबस्टर दरम्यान एका विश्रांतीसाठी सिनेट सोडले होते, पण बुकर यांनी संपूर्ण २५ तास सिनेटमध्ये घालवले.