छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती आहे. महापुरुषाच्या नावाने सार्वजनिक ठिकाणची जागा बळकावण्याचे काम सुरू आहे, असे विधान रावसाहेब दानवे यांनी करत थेट अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.
दरम्यान, सिल्लोडवरून अनेकदा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. नुकतेच प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाने संधी दिली तर २०२९ मध्ये लोकसभा लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.
सिल्लोडमध्ये जिल्हा परिषदेची चार-पाच एकर जागा महापालिकेत घेतली आहे. अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळात ज्या भानगडी केल्या, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले, असा हल्लाबोल अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
अब्दुल सत्तार या व्यक्तीविरोधात मी नाही. पण त्यांची जी वागण्याची पद्धत आहे, त्यामुळेच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील लोक त्यांच्यावर नाराज आहेत.
एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दिला जात असून इतर लोकांना फायदा न मिळू देणे ही त्यांची विचारधारा आहे, असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. सिल्लोडच्या प्रत्येक चौकाचे नाव काय आहे? ते बघा. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची नावे नाहीत. नावांवरूनच त्या गावाची रचना कळते. त्यांची विचारधारा कशी आहे, ते कळते असे ते पुढे म्हणाले.
रावसाहेब दानवे म्हणाले की, मी राज्यसभेवर आणि विधानसभेवर जाणार नाही. मला पक्षाने खूप काही दिले आहे. माझी दोन मुले आमदार आहेत. जर पक्षाने संधी दिली तर मी पुढची लोकसभा निवडणूक पुन्हा लढवेन, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. राजकीय पक्षांनी एकत्र बसू नये का? आम्ही एकत्र बसतो हे संजय राऊत यांचे दु:ख आहे. आमचा पक्ष म्हणजे परिवार असून यांचा पक्ष परिवाराचा पक्ष आहे, अशी टीका केली.