नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (आप) पराभव झाला, तर भाजपने विजय मिळवला. या विजयानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेवरून आप आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात पटपडगंज येथील भाजप आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
रवींद्र सिंह नेगी यांनी आरोप केला की, “मनीष सिसोदिया आणि आपच्या कार्यकर्त्यांनी पटपडगंज येथील आमदार कार्यालयातील सर्व सरकारी साहित्याची चोरी केली आहे. मनीष सिसोदिया आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार कार्यालयातून एसी, खुर्च्या, पंखे आणि एलईडी चोरले आहेत. दरम्यान, रवींद्र सिंह नेगी यांनी केलेल्या आरोपाबाबत पीडब्ल्यूडीचे जेई वेद प्रकाश यांनी भाष्य केले आहे. पीडब्ल्यूडीकडून आमदारांच्या कार्यालयात कोणतेही साहित्य पुरवले नव्हते असे जेई वेद प्रकाश यांनी सांगितले. तर दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांचे प्रतिनिधीनी सांगितले की, एकही सरकारी वस्तू घेतलेली नाही. तसेच, जे आमचे साहित्य होते. कार्यकर्त्यांचे साहित्य होते, ते कार्यकर्ते घेऊन गेले.
आपकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया नाही
मनीष सिसोदिया यांच्या प्रतिनिधीने असेही सांगितले की ज्या २ एसी गायब असल्याचा आरोप केला जात आहे, त्या भाड्याने घेतल्या होत्या. त्यामुळे ज्यांचे एसी होते, त्यांनी ते काढून घेतले. दरम्यान, भाजप आमदाराने मनीष सिसोदिया यांच्यावर केलेल्या आरोपांवर आम आदमी पक्षाकडून (आप) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.