25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeसीईओंनी केला गणिताचा पंचनामा; कोचिंग क्लासचे शिक्षक पर्यवेक्षक

सीईओंनी केला गणिताचा पंचनामा; कोचिंग क्लासचे शिक्षक पर्यवेक्षक

संभाजीनगर : प्रतिनिधी
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आडगाव बु. येथील काशीराम विद्यालयाच्या नावावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९, तर खासगी इंग्रजी शाळांचे दोन शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहात असल्याची बाब उघड झाली आहे. खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केला आहे. बारावीचा गणिताचा पेपर असताना हा सगळा प्रकार सुरू होता.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी क्लासच्या शिक्षकांची माहिती समोर आली आहे. गटशिक्षणाधिका-यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरूद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिस करीत असले तरी येथे पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी केलेला घोळ समोर आला आहे. एक दोन कॉपी आढळल्या असत्या तर समजू शकलो असतो, मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याचे आढळून आल्याचे विकास मीना यांनी सांगितले. या प्रकरणी मीना यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. संस्थाची मान्यता रद्द करण्याची देखील कारवाई आपण सुरू करणार आहोत. या परीक्षेत अशाप्रकारे कॉपी होऊ नये म्हणून आम्ही अधिकारी प्रत्येक परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.

चौकट
‘ते’ कर्मचारी गरुडझेप अकॅडमीचे?
आदर्श विद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करणारे ते ९ शिक्षक गरुडझेप अकॅडमीचे असल्याची शिक्षण वर्तुळात चर्चा होती. या अनुषंगाने गरुडझेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे ९ शिक्षक गरुडझेप अकॅडमीचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे शिक्षक काशीराम विद्यालयाचे किंवा गरुडझेप अकॅडमीचे नसतील तर मग कोणत्या शाळेचे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR