लातूर : प्रतिनिधी
नीट गुणवाढ व्यवहारातील मुख्य आरोपी असलेला व दिल्ली येथील गंगाधर याला आंध्र प्रदेशातून सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सध्या तो बंगळुरु येथे सीबीआय कोठडीत आहे. देशभर होत असलेल्या नीट घोटाळ्याची चौकशी गंगाधर भोवती फिरत आहे. लातूर येथील आरोपी संजय जाधव याने थेट गंगाधरशी पैसे व अॅडमिशन कार्डचे व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
यामुळे या दोघांनाही एकत्र आणुन पुढील तपास होणे आवश्यक आहे. यासाठी संजय जाधव याच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर संजय जाधवला पुन्हा न्यायालयापुढे हजर करावे लागणार आहे. यामुळे या दोन दिवसांत संजय जाधव व गंगाधर यांना समोरासमोर आणुन तपास करण्यासाठी सीबीआय अधिकारी गंगाधरला आज लातूरला घेऊन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीबीआय कोठडीतील संजय जााधव व जलील पठाण यांची कोठडी शनिवारी संपली. यामुळे दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी जलील पठाण याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर संजय जाधव याला दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.
संजय जाधव याने दिल्लीचा आरोपी गंगाधर याला विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड व पैसे पाठविल्याचे पुरावे सापडले आहेत. त्या दोघांनी मिळून आणखी किती व कुठल्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला आहे का, याचा तपास सीबीआयला करायचा आहे, त्यामुळे गंगाधर व संजय जाधव यांना एकत्र आणुन तपास करण्यात येणार आहे.
गंगाधर सध्या बंगळूरु येथील सीबीआय कोठडीत आहे. तर संजय जाधव हा लातूरमध्ये सीबीआय कोठडीत आहे. यामुळे जाधव याच्या दोन दिवसांच्या कोठडी कालावधीत सीबीआय संजय जाधवला बंगळुरुला नेणार की, गंगाधरला लातूरला आणणार, याची चर्चा सध्या सुरु आहे.