25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रसीबीआय पथक आरोपींना ताब्यात घेणार

सीबीआय पथक आरोपींना ताब्यात घेणार

सर्व कागदपत्रे सुपूर्द, दोन आरोपी घेणार ताब्यात
लातूर : प्रतिनिधी
नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये दाखल झालेल्या सीबीआय पथकाने आज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली असून, आता या प्रकरणातील आरोपींना सीबीआयचे पथक चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने तपासातील सर्व कागदपत्रे आणि जप्त मुद्देमाल सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा आदेशही पोलिसांना दिला. त्यामुळे उद्या मंगळवारी आरोपींचा ताबा मिळू शकतो.

नीट प्रकरणात सीबीआयच्या पथकाने मुख्य न्यायदंडाधिकारी लातूर यांच्या न्यायालयात आरोपीचा ताबा मिळण्यासाठी आज अर्ज केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, आरोपीचा ताबा आणि तपासातील सर्व कागदपत्रे आणि जप्त मुद्देमाल महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयकडे देण्याचा आदेश दिला. त्यानुसार सोमवारी दिवसभर सर्व कागदपत्राची छाननी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासातील कागदपत्रे यांची वर्गवारी करण्यात आली आहे. या कागदपत्रांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.

लातूरमध्ये चौघांविरोधात गुन्हा
लातूर पोलिसांनी नीट पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आले. यात जलील पठाण आणि संजय जाधव या दोन शिक्षकांचा समावेश आहे. फरार आरोपीमध्ये इराण्णा आणि गंगाधर यांचा समावेश असून, त्यांचा पोलिस पथक शोध घेत आहे. या चार जणांनी लातूरमधील अनेक विद्यार्थ्यांना परराज्यात नीट परीक्षा देण्यासाठी तयार केले होते. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR