जोधपूर : वृत्तसंस्था
भारत लवकरच आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी एक व्यापक अँटी-ड्रोन युनिट तयार करणार आहे, आगामी काळात मानवरहित ड्रोनचा धोका गंभीर होणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ‘बीएसएफ’च्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेझर-सुसज्ज अँटी-ड्रोन गन-माउंट सिस्टमचे सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
या सिस्टममुळे पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन निष्क्रिय करणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या घटनांमध्ये ३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. येत्या काळात ड्रोनचा धोका अधिक गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत संरक्षण आणि संशोधन संस्था व डीआरडीओ यांच्या सहकार्याने ‘संपूर्ण सरकारी’ दृष्टिकोनाने आम्ही या समस्येचा सामना करत आहोत. त्यामुळे आगामी काळात आम्ही देशासाठी सर्वसमावेशक अँटी ड्रोन युनिट तयार करणार आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले.
मोदी सरकार व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामद्वारे उत्तर सीमावर्ती गावांमध्ये कनेक्टिव्हिटी, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधा सुधारत आहे, ज्यामुळे स्थलांतर थांबत आहे. देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, सीमा सुरक्षा वाढवणे आणि ४८,००० कोटी रुपयांचा निधी वाटप करून या दुर्गम भागात राहणा-या लोकांसाठी काम करणे ही मोदी सरकारची सर्वात मोठी योजना आहे. सुमारे तीन हजार गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येत आहे, असे अमित शाह म्हणाले.