नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सीमेलगत गोळीबार सुरू केला. तसेच भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारताने पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानकडून येणारे ड्रोन हवेतच लष्कराने पाडले. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी फटाके फोडणे आणि ड्रोन उडवणे यावर बंदी घालण्यात आली. राजस्थानातील काही जिल्ह्यांत बाजारपेठा लवकर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच श्रीनगर विमानतळावरदेखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवाई संरक्षण बॅटरी सक्रिय करण्यात आल्या आहेत.
दिल्लीत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सर्व अधिका-यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. हरियाणा सरकारनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणा सरकारने पोलिस आणि आरोग्य कर्मचा-यांच्या रजा रद्द केल्या.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील उना येथील शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. बारमेर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण वीजपुरवठा खंडित राहील. कोणत्याही वाहनाची हालचाल पूर्णपणे बंदी असेल, असे सांगण्यात आले. जैसलमेर येथे सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत ब्लॅकआउट राहील. संरक्षण क्षेत्राच्या ५ किलोमीटरच्या परिघात हालचाली पूर्णपणे प्रतिबंधित असतील. यूएव्ही, ड्रोन कॅमेरे, गरम हवेचे फुगे इत्यादी उडवण्यावर पूर्ण बंदी आहे. तसेच शहरात फटाके आणि फटाके फोडण्यावरही बंदी आहे.
राजस्थानात ५ जिल्ह्यांत
शाळा, कॉलेज बंद
राजस्थानमधील जैसलमेर, बारमेर, बिकानेर, जोधपूर आणि श्रीगंगानगर या ५ जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि कोचिंग संस्था पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असे सांगण्यात आले. यासोबतच पंजाबमध्ये पुढील ३ दिवस सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील, असा आदेश जारी करण्यात आला.
सायरन वाजले तरच
सर्व दिवे बंद करा
अमृतसर प्रशासनाने लोकांना नवीन सूचना दिल्या आहेत. आता ड्रिल म्हणून कोणतेही ब्लॅकआउट होणार नाहीत. जर सायरन वाजला तर तो इशारा आहे, असे समजा आणि सर्व दिवे बंद करा, असे सांगण्यात आले.
बाजारपेठा बंद,
फटाक्यांवर बंदी
माउंट अबूमधील बाजारपेठा संध्याकाळी ७ नंतर उघडतील. आजपासून माउंट बंद, एसडीएम आयएएस डॉ. अंशु प्रिया यांनी सूचना जारी केल्या. माउंट अबूमध्ये रात्री ८ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित होईल तर मोहालीत सर्व सिनेमा हॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच गुजरातमध्ये १५ मे पर्यंत फटाके आणि ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली असून, शाळेच्या सुट्याही जाहीर केले आहेत.