सेलू : असंख्य गोष्टींमुळे डोके तुंबते. काळ नाही तर मनातील विचारांचे ओझे माणसाला म्हातारपण देते. त्यामुळे विचार डोक्यात यावेत काम करून निघून जावेत. ही विचारांची स्वच्छता ज्यांना करता येते तो माणूस सुखी होतो, असे आशिर्वचन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी दिले.
शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हनुमानगढ परिसरात गुरूवार, दि.१७ रोजी राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी व अमोघ अमृत वाणीतून सुरू असलेल्या रामकथेचे तृतीय पुष्प भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. रामकथेसाठी वृंदावनधामचा देखणा मंच उभारण्यात आला होता. बालपणीचे पारतंत्र्य, यौवनातील विषयासक्ती, वृध्दापकाळातील रोगराई, नंतर मृत्यू असेल तर मग जगायचे कशाला. या प्रश्नाचे उत्तर असलेल्या योगवाशिष्ट ग्रंथांतील उपदेश राम कथेच्या तिस-या दिवशी सारांश रुपाने स्वामींनी सांगितला. ते म्हणाले की, माणसाला अज्ञानाची जाणीव झाली की ज्ञानाचा प्रकाश जीवनात येतो,
विचार करणे गरजेचे आहे, विचारांमुळे आत्मज्ञान मिळते. समस्या, प्रश्न कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. या कोणत्याही बंधनात गुंतून न पडता ज्ञान आत्मसात करून मुक्त व्हावे. सर्व जगाचा डेटा आपल्याकडे आहे. पण अंतरंगातील डेटा आपण घालून बसलो आहोत. सर्व प्रश्न आत्मज्ञानाच्या अभावामुळे निर्माण झालेले आहेत. बुध्दी शितल ठेवली की, सर्व प्रश्न आपोआप सुटतील असेही ते म्हणाले.कथा श्रवणासाठी महिला -पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुत्रसंचलन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.