मुंबई : प्रतिनिधी
आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षबांधणीत पक्षातील तरुणांना संधी देण्याची रणनीती आहे. राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी आता ठाकरे गटाचे सचिव झाले आहेत. सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानससभेत ठाकरे गटाकडून सुधीर साळवी इच्छुक होते. मात्र विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच ‘मातोश्री’ने संधी दिली होती.
दरम्यान, सुधीर साळवी हे सध्या शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. २०२४ लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांना देखील निवडून आणण्यात सुधीर साळवी यांचा मोठा वाटा होता. त्यावेळी सुधीर साळवी पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू होती. मात्र सुधीर साळवी ठाकरेंसोबत कायम राहिले.
सुधीर साळवी हे राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव देखील आहेत. सुधीर साळवी हे गेली २० वर्षे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आहेत तसेच महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे विश्वस्त म्हणून देखील सुधीर साळवी कार्यरत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सुधीर साळवी यांची पक्षाच्या सचिवपदावर आज नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत सुधीर साळवी यांनी केलेल्या भरीव कामाची दखल ‘मातोश्री’ने घेतली असल्याची शिवसेना ठाकरे गटात चर्चा आहे.