32.4 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeपरभणीसुनंदा कुलकर्णी (डिघोळकर) यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून निवड

सुनंदा कुलकर्णी (डिघोळकर) यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून निवड

परभणी : प्रतिनिधी
भारत उत्सव २०२५ आयोजित अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन पुणे (अल्को) या संस्थेच्या वतीने घेण्यात येणा-या स्पर्धेतील नाटक आणि आधुनिक नृत्यासाठी येथील प्रसिध्द नृत्यांगना व नाट्य कलावंत सुनंदा अजय डिघोळकर यांची परीक्षक (ज्युरी) सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या संदर्भात अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी प्रमोद नन्नवरे यांच्या वतीने डिघोळकर यांना पत्रही पाठवण्यात आले आहे.

पुणे येथे १६ ते २२ मे दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. भारतात निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर होते आणि त्यामधून स्पर्धेचा विजेता घोषित केला जातो. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील नृत्य, संगीत, गायन आणि नाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून येथील नृत्यांगना व नाट्य कलावंत सुनंदा डिघोळकर यांची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धक भाग घेणार आहेत. यामध्ये बासरी वादन, गायन, नृत्य, तबला, व्हायोलिन, म्युझिक, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, कथ्थक नृत्य, भरत नाट्यम आदी प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे. पुणे येथे विविध ठिकाणी एक आठवडा हे कार्यक्रम पार पडणार असून २२ मे रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

या संस्थेच्या वतीने परीक्षकांसाठीही एक समिती नियुक्त केली जाते आणि त्यामधून परीक्षक निवडले जातात. सुनंदा डिघोळकर यांचे नृत्य कौशल्य पाहून या समितीने त्यांची परीक्षक म्हणून निवड केली आहे. पूर्ण मराठवाड्यातून सुनंदा डिघोळकर यांची निवड करण्यात आली आहे. डिघोळकर यांची निवड हा परभणीकरांसाठी बहुमान आहे. त्याबद्दल सुनंदा डिघोळकर यांचे अजय डिघोळकर, वर्षा जोशी, रवी पाठक, भक्ती कुलकर्णी, रेणुका कुलकर्णी, अतुल साळवे, अर्चना चिक्षे आदींसह विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR