९ महिन्यांपासून स्पेस सेंटरवर होत्या मुक्कामी
सॅन्फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता आणि बुच हे दोघेही स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतणार आहेत. दोघांनी गेल्या वर्षी ५ जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले होते. ते ८ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते. मात्र, अंतराळ यानामधून हीलियमची गळती आणि वेग कमी झाल्याने ते ९ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकले. अखेर बुधवारी पहाटे ३.२७ वाजता ते पृथ्वीवर पोहोचतील. त्यांचे यान फ्लोरिडातील समुद्रात उतरणार आहे. सुनीता आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परतण्यासाठी एकूण १७ तासांचा कालावधी लागणार आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर हे यान अमेरिकेतील फ्लोरिडा किना-याजवळ पाण्यात उतरेल.
६१ वर्षीय बुच विल्मोर आणि ५९ वर्षीय सुनीता विल्यम्स गेल्या २८६ दिवसांपासून म्हणजेच ९ महिन्यांपासून अंतराळात मुक्कामी होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन प्रक्षेपित केले. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून हे प्रक्षेपण केले होते. यामध्ये क्रू ड्रॅगन कॅप्सूलशी संलग्न ४ सदस्यांची टीम आयएसएससाठी रवाना झाली होती. या मोहिमेला क्रू-१० असे नाव देण्यात आले. नवीन क्रू १० मध्ये नासाच्या अॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स, जपानी स्पेस एजन्सी जेएएक्सएचे ताकुया ओनिशी आणि रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसचे कॉस्मोनॉट किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. हे चार अंतराळवीर आयएसएसमध्ये पोहोचले आणि सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि क्रू-९ च्या इतर दोन सदस्यांची जागा घेतली.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी बोईंगच्या स्टारलाइनर यानातून उड्डाण केले होते. हे मिशन केवळ ८ दिवसांचे होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ९ महिने अंतराळात राहावे लागले आणि स्टारलाइनर अंतराळयान कोणत्याही समस्यांशिवाय रिकामे परतले. परंतु सुनिता विल्यम्ससह तिच्या साथीदाराला अंतराळात अडकून पडावे लागले.
सुनीता आणि बुच विल्मोर बोइंग आणि नासाच्या संयुक्त क्रू फ्लाइट टेस्ट मिशनवर गेले होते. अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाण्याची आणि त्यांना परत आणण्याची अंतराळयानाची क्षमता सिद्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. अंतराळवीरांना अवकाश स्थानकावर ८ दिवसात संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. सुनीता आणि विल्मोर हे पहिले अंतराळवीर आहेत ज्यांना अॅटलस-व्ही रॉकेट वापरून अंतराळ प्रवासासाठी पाठवण्यात आले होते. स्टारलाइनर अंतराळ यानाला प्रक्षेपण झाल्यापासून अनेक समस्या होत्या. यामुळे ५ जूनपूर्वीही अनेक वेळा प्रक्षेपण फेल झाले होते. प्रक्षेपणानंतरही अंतराळयानामध्ये समस्या असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर ती समस्या खरी ठरली.