सुमारे नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची बुधवारी पहाटे पृथ्वीवर सुखरूप घरवापसी झाली. त्यांच्या घरवापसीसंबंधी तळ्यात-मळ्यात सुरू होते. काही जणांनी तर त्यांच्या परतण्याची आशाच सोडून दिली होती. सुनीता व विल्मोर अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर आठवडाभरात परतणार होते. परंतु बोईंग स्टारलाइनर आंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना नऊ महिने अंतराळात अडकून पडावे लागले होते. अखेर नासा आणि स्पेसएक्सच्या मोहिमेद्वारे त्यांचे पुनरागमन शक्य झाले. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाची वाट पहात होते. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत पृथ्वीवर परतले आहेत.
खरं तर कोणतीही अंतराळ मोहीम ही जोखमीची असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक होते. संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले होते. सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेस एक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या ८ लँडिंग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या. फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेचा पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. ६ वर्षे फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहिमा अमेरिकेच्या पश्चिम किना-यावरच्या समुद्रात स्प्लॅश होतील. टॅलाहासी हा निवडलेला लँडिंग झोन होता. कारण येथील हवामान रिकव्हरीसाठी योग्य होते. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूलभोवतीचे बाहेरचे तापमान वाढत असताना पीआयसीए ३.० हीटशिल्डने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिले. दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान कमी राहायला मदत होईल.
ड्रॅगन फ्रीडमला सोसावे लागणारे सर्वोच्च तापमान १९२६.६६७ सेल्सिअस म्हणजे ३५०० फॅरनहाईट इतके होते. फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग होता. काही काळानंतर हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. वातावरणात शिरण्यापूर्वी क्रूने खिडकीच्या झडपा बंद केल्या. ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. त्यामुळे कॅप्सूलचा वेग कमी झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल १८ हजार फुटावर आल्यावर उघडली तर दुसरी मुख्य जोडी साडेसहा हजार फुटावर उघडली. त्यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आले. भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला. अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे १७ तासांचा होता. ‘क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम’ अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचे स्वागत केले. परतलेले अंतराळवीर सुखरूप आहेत अशी माहिती नासाने दिली आहे.
८ दिवसांसाठी अंतराळ प्रवासाला गेलेल्या सुनीता विल्यम्स २८६ दिवस अंतराळात अडकल्या होत्या. या दरम्यान अंतराळ स्टेशनवर प्रत्येक अंतराळवीराला दररोज सुमारे १.७२ किलो अन्न पुरवले जात होते. अंतराळवीरांचे अन्न फ्रीज, ड्राय अथवा पॅक केलेले असते. मांसाहारी पदार्थ आणि अंडी पृथ्वीवर शिजवली जातात आणि पॅक केली जातात. अंतराळात ती फक्त गरम करण्यात येतात. अंतराळात अंतराळवीर दूध पावडर, धान्य, रोस्ट चिकन, पिझ्झा असे पदार्थ खातात. २८६ दिवस संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे अंतराळवीरांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’ मध्ये राहावे लागणार आहे. अंतराळवीर पृथ्वीवर जरी परतले असले तरी त्यांना लगेच पूर्वीसारखे सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यांना किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. मोठ्या कालावधीसाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल,
त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीराने अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना नियोजित उपचार घेणे आवश्यक आहे. सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांनी त्यांच्या २८६ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात एकूण १२ कोटी १३ लाख ४७ हजार ४९१ मैल प्रवास केला. पृथ्वीभोवती ४ हजार ५७६ फे-या मारल्या. या मोहिमेत सुनीता विल्यम्स सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला झाली आहे. सुनीता विल्यम्स यांनी एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर स्पेसवॉक केला. सर्वाधिक काळ स्पेसवॉक केलेल्या अंतराळवीरांच्या यादीत त्या चौथ्या क्रमांकावर आहेत. सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने सुमारे ९०० तास संशोधन केले. त्यांनी दीडशेहून अधिक प्रयोगही केले. पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती आहे. अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी असल्याने अंतराळवीरांच्या शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात शिवाय जास्त काळ अवकाशात राहिल्याने त्यांच्या शरीरावर अनेक बदल दिसून येऊ शकतात.
अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणामुळे कंबरेच्या आणि पायांच्या स्नायूंचा आकार आणि ताकद कमी होण्याची शक्यता असते. कारण अंतराळात पायांचा जास्त वापर होत नाही. त्यामुळे हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका असू शकतो. अंतराळवीरांना उभे राहणे आणि चालणे कठीण होऊ शकते. त्यांना मानसिक त्रासही होऊ शकतो, ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. अवकाशात उच्च -ऊर्जेच्या किरणोत्सर्गापासून कोणतेही संरक्षण नसल्याने अंतराळवीरांना सूर्यापासून येणा-या किरणोत्सर्गाच्या उच्च पातळीला सामोरे जावे लागते. किरणोत्सर्गाच्या संपर्कात राहिल्याने त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. मानवजातीच्या कल्याणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून अंंतराळवीर संशोधन करीत आहेत. त्यांना सुखरूप पृथ्वीवर आणल्याबद्दल शास्त्रज्ञांसाठी हॅट्स ऑफ!