वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जगभराच्या नजरा भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या सुटकेकडे लागल्या आहेत. कारण, ‘नासा’ने सुनीता विल्यम्ससाठी रेस्क्यू मिशन सुरू केले आहे. त्यासाठी रशियाच्या मदतीने अंतराळयान पाठवण्यात आले आहे.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जवळपास ६ महिन्यांपासून अंतराळात आहेत. ५ जूनपासून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. इतके दिवस अंतराळात राहिल्याने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची तब्येत देखील बिघडत चालली आहे.
अंतराळात ताज्या अन्नाचा पुरवठा होत नसल्याने त्यांची तब्येत चांगली नसल्याचे बोलले जात आहे. ‘नासा’ने भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून सोयुज रॉकेटद्वारे एक अन-क्रू विमान (क्रू मेंबर्सशिवाय) पाठवले आहे.
हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल. अंतराळ स्थानकावर असलेल्या फूड सिस्टीम लॅबोरेटरीमध्ये ताज्या अन्न पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ‘नासा’ने तातडीने पावले उचलली आणि अंतराळवीरांना जीवनावश्यक वस्तू आणि ताजे अन्न पुरवता यावे यासाठी ३ टन अन्न पाठवण्याचा निर्णय घेतला.