लातूर : प्रतिनिधी
येथे छावा संघटनेचे कार्यकर्ते विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचे मुख्य सूत्रधार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हेच आहेत. त्यामुळे खासदार सुनील तटकरे, सुरज चव्हाणसह त्यांच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्यात फिरु देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
शेतक-यांविषयी विवेक शून्य वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये शेतक-यांच्या व जनतेच्या हिताची चर्चा करण्याऐवजी चक्क ऑनलाईन रम्मी खेळत होते. या महाभागाने यापूर्वी अनेक वेळा शेतक-यांच्या विरोधात गरळ ओकली आहे. कृषी मंत्र्यांनी शेतक-यांच्याबाबतीत सतत वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. याशिवाय त्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे शासकीय योजनेतून सदनिका मिळवली. ज्यामध्ये त्यांना शिक्षाही झाली. निवडणुकीपूर्वी शेतक-यांची कर्जमाफी करू, अशी वल्गना करून ही कर्जमाफी होत नाही. उलट सभागृहात मोबाईलमध्ये रम्मीचा डाव खेळतो, अशा व्यक्तीस एक क्षणही मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, म्हणूनच छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी खासदार सुनिल तटकरे यांना भेटून निवेदन दिले.
त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. विजयकुमार घाडगे यांच्यासोबत असणा-यांना सुध्दा मारहाण केली. विजयकुमार घाडगे यांना जिवे मारण्याचा उद्देश मारेक-यांचा होता. म्हणून शासनाने २५ जुलैच्या आत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्काळ मंत्रीपदावरून बडतर्फ करावे व सुरज चव्हाण व त्याच्या सर्व साथीदारांविरूध्द कलम १०९ बी. एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली.