21 C
Latur
Wednesday, February 4, 2026
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला याचा आनंद; शरद पवार

सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला याचा आनंद; शरद पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामतीमधील विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर, अन्त्यसंस्कारावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय हे एकत्र आले होते. पण, त्यांच्या निधनाच्या तिस-या दिवशीपासूनच राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तसेच, या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांनी केल्याचा दावाही काही नेत्यांनी केला. त्यामुळे, अनेक राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. याचदरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळला. यावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अतिघाई केली आणि त्यांनी लगेचच शपथविधीचा कार्यक्रम घेतल्याची टीका होत आहे, याबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, मला यावर कोणतेही भाष्य करायचे नाही. तसेच, यावेळी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. यावर शरद पवार म्हणाले की, त्यांना संधी दिली याचा आनंद आहे, असे म्हणत आपली पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही असे म्हणत आपले मत मांडले. तसेच, यावेळी त्यांना अजित पवार यांचे स्मारक उभारले जाणार असून त्याबद्दलही विचारण्यात आले. यावर शरद पवार म्हणाले की, ‘मीही वर्तमानपत्रात वाचले होते की, आम्ही स्मारक करणार आहोत, पण ही गोष्ट मला माहिती नाही. मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. मला याबद्दल माहिती असली पाहिजे. पण, मी आतापर्यंत याबद्दलची फक्त चर्चा ऐकली आहे. याबद्दल काय करायचं याबद्दल एकत्र बसून चर्चा करू. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही.’’ असे म्हणत त्यांनी स्मारकाचा मुद्दा सध्यापुरता खोडून काढला.

पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव घेतले होते. यावर शरद पवार म्हणाले की, माझा उल्लेख का केला हे समजले नाही. विलीनीकरणावर अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा होती. या सगळ्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना याबद्दल भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR