जालना : शहरातील भोकरदन नाका येथे सुनेने सासूचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खून केल्यानंतर गुन्हा उघड होऊ नये यासाठी सुनेने सासूचा मृतदेह पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता संजय शिनगारे (वय ४५) या सासूचा कौटुंबिक वादातून संशयित सून प्रतीक्षा शिनगारे हिने खून केल्याची घटना घडली आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिनगारे या सून प्रतीक्षा शिनगारे यांच्यासोबत किरायाच्या घरात राहतात. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून दोघीच होत्या. कौटुंबिक वादातून आज (बुधवार) पहाटे सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला.
यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतीक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला. मात्र, घरमालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सासूचा मृतदेह सोडून प्रतीक्षा फरार झाली. संशयित आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदरबाजार पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.