जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे या विधनसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्या असून, त्या १७ ते १९ ऑगस्ट तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात त्या जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांत सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून उत्तर महाराष्ट्रात पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे.
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला होता. आता खासदार सुप्रिया सुळेही जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यात सहा जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या दृष्टीने पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. सूत्रांच्या मते, सुळे यांच्या दौ-यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत हे देखील चार दिवस जळगाव दौ-यावर जाणार आहेत. तर दि. २५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जळगाव दौरा करणार आहेत.