पुणे : प्रतिनिधी
काही राजकीय मंडळींना आपल्या शिक्षण संस्थांवर टाच येणार याची जाणीव झाल्यामुळेच त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम अचानक उफाळून आल्याचे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम (पॅटर्न) लागू होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता नवा वाद सुरू झाला आहे. याच घोषणेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तर ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची अंमलबजावणी म्हणजे राज्य शिक्षण मंडळ संपूर्णत: बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सुळेंच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पटलवार केला आहे. याबाबत चाकणकर यांनी एक्स आणि फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.
तसेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत सरकारी शाळेतील विद्यार्थी कुठेतरी कमी पडतो. मग हा अभ्यासक्रम सरकारी शाळेत लागू झाल्यावर तेथील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात क्रांती घडेल. काही राजकीय मंडळींना आपल्या शिक्षण संस्थांवर टाच येणार याची जाणीव झाल्यामुळेच त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम अचानक उफाळून आल्याचे म्हटले आहे.
स्वत: व त्यांची मुले ही परदेशात शिकली
सुप्रिया सुळेंना या निर्णयामुळे महाराष्ट्राची ओळख पुसणार अशी शंका वाटते. मग संसदेत काम करत असताना तुम्ही मराठीतच का बोलत नाहीत? तिथे मराठी बोलताना लाज वाटते का? असा खरमरीत सवाल चाकणकर यांनी केला आहे. तसेच अभिजात भाषा मराठी, संस्कृती, परंपरा याचा विचार सुप्रिया सुळे करतात कारण त्या स्वत: व त्यांची मुले ही परदेशात शिकून आलेत! असाही टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.