26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रसुरक्षा कपातीवरून महायुतीत धुसफूस

सुरक्षा कपातीवरून महायुतीत धुसफूस

फडणवीसांकडून शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न? ठाकरेंना ‘झेड प्लस’, तर शिंदेंच्या आमदारांना ‘वाय’ सुरक्षा

मुंबई : प्रतिनिधी
नुकतीच राज्याच्या गृहखात्याने माजी आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात केली. या कपातीवरून महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. पण महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय कार्यक्रमांत एकत्र उपस्थिती दर्शवत नाराजीच्या चर्चांवर टोलेबाजी जरी या नेत्यांकडून होत असली तरी, शिवसेना आणि भाजप यांच्यात आलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली शिवसेनेत बंड केले होते. जवळपास २० आमदार शिंदेंसोबत गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने त्यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या २० आमदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था प्रदान करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या विशेष संरक्षण विभागाने आढावा घेऊन शिंदे गटाच्या या आमदारांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला.

‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेंतर्गत एकनाथ शिंदे यांच्या आमदारांसाठी तीन शस्त्रधारी पोलिस सुरक्षा रक्षक आणि पोलिस वाहन तैनात होते. तसेच, या आमदारांच्या निवासस्थानी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असेपर्यंत हा दर्जा कायम होता. मात्र आता एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याने आमदारांच्या सुरक्षेसाठी फक्त एकच शस्त्रधारी पोलिस सुरक्षा रक्षक तैनात असेल. परिणामी, सुरक्षा रक्षक कमी झाल्याने आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदेंच्या आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा राज्याच्या गृहविभागाकडून काढून घेण्यात आली असली तरी, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘झेड प्लस’ सुरक्षाकवच कायम ठेवण्यात आले आहे. यावरून सध्या शिंदे गटात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदे-फडणवीस यांच्यात ‘कोल्ड वॉर’
मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नियुक्ती केली होती. त्यानंतर उदय सामंत यांनी उद्योग खात्याच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. या एकापाठोपाठ घडणा-या घटनांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR