बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रमजान ईदनिमित्त देशातील मुस्लिम बांधवांना ‘सौगात-ए-मोदी’ची घोषणा केली. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांमध्ये इफ्तार पार्ट्यांमधील सहभागाचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात नागपूरची दंगल, औरंगजेब कबरीचा मुद्दा या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव आणि हिंदू-मुस्लिम यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले भाजपाचे आमदार सुरेश धस हे सध्या बीड जिल्हा आणि आपल्या आष्टी मतदारसंघातील ‘दावत-ए-इफ्तार’ पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावत आहेत. डोक्यावर फर कॅप, वाढलेली पांढरी दाढी अशा डॅशिंग लूकमध्ये वावरणा-या धस यांची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींच्या अटकेसाठी दररोज नवनवे पुरावे, दावे आणि आकाचा उल्लेख करत धस यांनी हे प्रकरण राज्यपातळीवर नेले.
धस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यभरात संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आक्रोश मोर्चे निघाले. धनंजय मुंडे यांचा राईट हॅण्ड असलेल्या वाल्मिक कराड याचा देशमुख हत्येशी असलेला संबंध, त्यासंदर्भातील पुरावे, कागदपत्रं माध्यमांसमोर आणत धस यांनी विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन दणाणून सोडले होते. आरोपींना अटक होऊन मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतही धस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
धनंजय मुंडे यांची गुप्तपणे घेतलेली भेट, सतीश भोसले ऊर्फ खोक्याला झालेली अटक त्यावरून धस यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप या सगळ्या संकटातून ते तूर्तास तरी बाहेर पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरेश धस हे नाव राज्यभरात गाजत आहे. त्यामुळे इफ्तार पार्ट्यांना त्यांची हजेरी लक्षवेधी ठरत आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशा इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. धस यांच्याभोवतीचा गराडा पाहता त्यांची क्रेझ कायम असल्याचे दिसून आले आहे.