निलंगा : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे रविवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर निलंगा येथील दादाबाग, सिंदखेड रोडवरील शेतात सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात ३ मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सुशीलाबाई पाटील निलंगेकर या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या आई, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आजी होत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई पाटील निलंगेकर या नेहमीच कुटुंबीयांच्याच नव्हे तर संपूर्ण निलंगेकरांसाठी सावलीसारख्या उभ्या राहिल्या. संपूर्ण निलंगा विधानसभा मतदारसंघ एक परिवार म्हणून सांभाळला. यामध्ये सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे निलंगेकर कुटुंबीयांचा त्यांच्या रूपाने आधारवड कोसळला. सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांच्या निधनाने निलंगेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.