27.4 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeलातूरसुसंस्कृत संतती हीच खरी संपत्ती 

सुसंस्कृत संतती हीच खरी संपत्ती 

लातूर : प्रतिनिधी
आधुनिक जगामध्ये सर्वत्र संपतीसाठी धावपळ चाललेली दिसून येत आहे. त्यात संस्कृतीची गळचेपी होताना दिसून येत आहे. परंतु, संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. संतती ठिक असले तर संपती टिकते अन्यथा संपतीचा विनाश अटळ आहे. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलने मात्र संसंस्कृत संतती निर्माण करण्याचा विढा उचलल्याचे त्यांच्या एकंदरीत उपक्रमातून दिसून येत आहे. अशा शिक्षण संस्थांची संख्या वाढली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
शहरातील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुल विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत मोठे यश मिळवले. विद्यार्थ्यांनी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलची गुणवत्ता सिद्ध करुन दाखवली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दि. १९ मे रोजी सहाकर मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, न्या. मोकाशी, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, डायटच्या प्राचार्या भागीरथी गिरी, प्रा. शिवराज मोटेगावकर, उद्योजक तुकाराम पाटील, अ‍ॅड. कालिदास देशपांडे, शिवानंद हेंगणे, पत्रकार धर्मराज हल्लाळे, चंदन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कलयुगात सर्वाधिक पुण्याचे काम ज्ञानदान आहे. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलचे संस्थापक चेअरमन रमेश बिरादार यांनी हे काम हाती घेतले आहे, असे नमुद करुन सहाकर मंत्री बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले, अंधारात प्रकाशाचे किरण निर्माण करण्याचे काम रमेश बिरादार करीत आहेत. एका-एका विद्यार्थ्यावर वैयक्तीक लक्ष देऊन त्यांना घडवीच्या काम ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलमध्ये होत आहे. अज्ञानी माणसाला ज्ञानी करण्याचे खुप मोठे काम येथे होत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलचे कौतूक करुन रमेश बिरादार यांनी खुप कष्टाने हे सारे उभे केले आहे. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलमध्ये दर्जेदार शिक्षणाबरोबरच सुसंस्कारही शिकवले जात आहेत. पालक, विद्यार्थी आणि शाळा ही त्रिसुत्री समन्वयाने एकत्र काम करीत असल्याचे चित्र ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलमध्ये पहावयास मिळते. त्यामुळे येथे गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रास्ताविक करताना रमेश बिरादार यांनी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलचा गेल्या १५ वर्षांचा प्रगतीचा आढावा सादर केला. आपली शाळा राज्यात पहिली यावी, यासाठी डेहराडूनपर्यंत जाऊन अभ्यास केला. विकासरत्न विलासराव देशमुख हे माझ्यासाठी आदर्श आहेत.  तसेच शहरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करुन, त्यांचे मार्गदर्शन घेऊनच ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलची वाटचाल सुरु असल्याचे ते म्हणाले. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलने मोफत शिक्षणासाठी पालकत्व घेतलेल्या आठ विद्यार्थ्यांना यावेळी पाहूण्यांच्या हस्ते प्रमाणत्र देण्यात आले. यावेळी धर्मराज हल्लाळे, न्या. मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. राम बोरगावकर, सोनू डगवाले, संतोष बिरादार, पी. जी. पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी रमेश बिरादार, सुयश बिरादार, सुजित बिरादार, डॉ. श्रीरंग बिरादार यांनी पाहूण्यांचे स्वागत केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR