नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सूर्य आणि चंद्रानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो शुक्र ग्रहावर लक्ष ठेवून आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने चार अवकाश प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यातील एक मिशन शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.
चांद्रयान-३ आणि गगनयाननंतर आता भारत व्हीनस ऑर्बिटर मिशन सुरू करणार आहे. या अभियानासाठी १२३६ कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत हे मिशन काय आहे आणि इस्रोला या मिशनद्वारे काय सिद्ध करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
या मिशनला व्हीनस ऑर्बिटर मिशन असे नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर आपल्या पोस्टद्वारे याची पुष्टी करताना, पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, भारत मार्च २०२८ पर्यंत आपले मिशन सुरू करेल. इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ही मोहीम राबवणार आहे.
पीएम मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, या मिशनद्वारे शुक्र ग्रहाचा सखोल अभ्यास केला जाईल आणि अंतराळ क्षेत्रात काम करणा-यांना नवीन संधी मिळतील. या मोहिमेद्वारे इस्रो शुक्राच्या कक्षेत एक यान पाठवणार आहे. त्यानंतर अनेक प्रयोग केले जातील. याशिवाय शुक्राच्या पृष्ठभागाचे परीक्षण करून तेथील वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह असून सूर्याचा प्रभाव समजून घेण्यासाठीही येथे संशोधन केले जाणार आहे. ‘द प्रिंट’ला दिलेल्या निवेदनात इस्रोच्या एका अधिका-याने सांगितले की, ‘हे एक प्रकारचे ऑर्बिटर मिशन आहे. या मोहिमेसाठी पाठवलेले अंतराळ यान शुक्राच्या कक्षेत पोहोचेल पण ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवले जाणार नाही. अंतराळ यानाची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की, ते सर्व प्रयोग करेल आणि पातळीच्या वर राहून माहिती गोळा करेल.