अमरावती : प्रतिनिधी
सर्वसामान्यांचा पैसा असलेल्या सेंट्रल बँकेची चांदुर रेल्वे शाखा आज कामकाज सुरु असताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत संपूर्ण बँक जळून खाक झाली आहे. बँकेत असलेली रोखही याबरोबर जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला दुपारच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. बँकेचे कामकाज सुरु असतानाचा आग लागल्याने पळापळ उडाली.
आग लागल्याचे समजताच बँकेचे कर्मचारी जीव वाचविण्यासाठी तसेच काम ठेवून बाहेर आले. यात जिवीतहानी झालेली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगितले जात आहे.
अग्निशामक दल या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू, आग विझत नसल्याने धामणगाव आणि तिवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलवण्यात आले आहेत.
बँकेला आग लागल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.