नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करण्याची अपेक्षा आहे. याद्वारे नवीन अत्याधुनिक शस्त्रे खरेदी केले जाणार आहेत.
पुरवणी अर्थसंकल्पात रु. ५० हजार कोटींची अतिरिक्त तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळू शकते. या अतिरिक्त वाटपातून सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी, संशोधन आणि विकास कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षणासाठी विक्रमी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९.५३ टक्क्यांनी जास्त आहे. विशेष म्हणझे, एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या १० वर्षांत संरक्षण बजेट जवळजवळ तीन पटीने वाढले आहे.
२०१४-१५ मध्ये संरक्षण बजेट २.२९ लाख कोटी रुपये होते. या वर्षी ६.८१ लाख कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. हे एकूण अर्थसंकल्पाच्या १३.४५% आहे. ऑपरेशन सिंदूरने भारताची संरक्षण क्षमता दाखवून दिली आहे.
भारताची मजबूत हवाई संरक्षण प्रणाली
पाकिस्तानसोबतच्या संघर्षादरम्यान, भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतून लावले. यासाठी भारताने लांब पल्ल्याच्या रशियन एस-४०० ‘ट्रायम्फ’ प्रणालींव्यतिरिक्त बराक-८ मध्यम पल्ल्याच्या एसएएम प्रणाली आणि स्वदेशी आकाश प्रणाली तैनात केली आहे. पेचोरा, ओएसए-एके आणि एलएलएडी तोफा (लो-लेव्हल एअर डिफेन्स गन) सारख्या हवाई संरक्षण प्रणालींचा देखील वापर करण्यात आला.