25.6 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeसंपादकीयसोनाराने टोचले कान!

सोनाराने टोचले कान!

औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशा स्पष्ट शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी महाराष्ट्रात सुरू असलेला औरंगजेबाचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर संघाची भूमिका स्पष्ट केली. तसेच कबर पाडण्याच्या मागणीपासून संघाने स्वत:ला दूर ठेवले. संघाच्या या भूमिकेमुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तोंडघशी पडल्याची चर्चा आहे. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नागपूरमधील हिंसाचाराचा निषेध केला. तसेच कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजाच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले. औरंगजेबाचा मुद्दा सद्यस्थितीत संयुक्तिक विषय नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला संघाकडून प्रोत्साहन दिले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी सोमवारी महाल परिसरात आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यात दर्ग्यावर अर्पण केली जाणारी चादर जाळल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर दंगल सुरू झाली. ‘विहिंप’च्या या आंदोलनाला संघाचाही पाठिंबा असल्याचा कयास लावला जात होता. परंतु, आंबेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर आता विहिंप तोंडघशी पडल्याची चर्चा आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील, असे कुठलेही कृत्य आम्ही केलेले नाही. प्रतिकात्मक पुतळ्यावर कुठलीही धार्मिक चादर किंवा कापड नव्हते. त्यामुळे ‘विहिंप’ च्या आंदोलनामुळे वातावरण बिघडले असे म्हणणे चूक आहे. हिंदू समाज हा कधीच हिंसाचार करत नाही, हिंदू समाज सर्वांना घेऊन चालतो. कबर हटवण्याबाबत सरकारला निर्णय घ्यायचा आहे, असे विहिंपचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले आहे. औरंगजेबाच्या कबरीवरील ‘आयत’ जाळल्याची अफवा समाजमाध्यमावर पसरवली गेली आणि त्यातून नागपूरची दंगल घडवली गेल्याची माहिती आहे. या दंगलीतील दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. गत आठवडाभर राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून जे वादंग सुरू झाले त्याचे पडसाद नागपुरात उमटले. तिथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, लाठ्या-काठ्यांचा वापर केला गेला, विशेष म्हणजे पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये जशी पोलिसांवर दगडफेक व्हायची तोच पॅटर्न नागपूरमध्ये वापरला गेला असेही म्हटले जात आहे.

त्यामुळे नागपूरच्या सुमारे ११ भागात संचारबंदी लागू करावी लागली. तिस-या दिवशीही ती उठवण्यात आली नव्हती. दगडफेकीत तीन डीएसपींसह सुमारे २५ पोलिस कर्मचारी जखमी झाले. असंख्य वाहने आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले. गत आठवडाभर औरंगजेबाच्या नावाने जो गदारोळ सुरू होता त्याला भाजपच्या काही नेत्यांची, मंत्र्यांची वाचाळ, बेताल वक्तव्ये कारणीभूत ठरली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मंत्री नितेश राणे यांना तंबी दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांना गदारोळासंबंधीची कल्पना असेल तर त्यांनी वेळीच आपल्या पक्षातील संबंधितांचे कान का उपटले नाहीत? उलट मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील दंगल पूर्वनियोजित होती असे म्हटले आहे. जर दंगल पूर्वनियोजित होती तर त्याची कल्पना नागपूरच्या पोलिसांना कशी काय आली नाही? राज्याच्या कुठल्याही भागात दंगल होणे, त्याला व्यापक स्वरूप लाभणे हे सर्वसामान्यपणे सरकारचे आणि पोलिस प्रशासनाचे अपयश मानले जाते. राज्याचा गुप्तचर विभाग झोपला होता काय असा प्रश्न उपस्थित होतोच!

गत काही दिवसांत या विषयावरील दोन्ही बाजूंची वक्तव्ये लक्षात घेता कोणत्याही बाजूकडून औरंगजेबाचे समर्थन झालेले नाही हे स्पष्ट दिसते. तरीसुद्धा औरंगजेबाचे समर्थन करणा-यांना सोडणार नाही अशा प्रकारची भाषा वापरून वातावरण तापत ठेवण्याची काय गरज होती? राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, विविध मागण्यांसाठी मोर्चे आणि आंदोलने सुरू आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी खोडसाळपणे औरंगजेबाच्या कबरीचा वाद उकरून काढण्यात आला काय असा प्रश्न उपस्थित होतो. मुळात कबरीचा विषय अचानकपणे पुढे येण्याचे काहीच कारण नव्हते. त्यातच विहिंपने राज्याच्या विविध भागात शिवजयंतीच्या दिवशी औरंगजेबाची कबर हटवण्यासंबंधी आंदोलने केली आणि त्यातून वातावरण चिघळले. अयोध्येप्रमाणे तेथेही कारसेवा करण्याची जाहीर धमकी दिली गेली.

हे सारे मुद्दाम वातावरण पेटवण्याचे काम सुरू असताना राज्याच्या गृह खात्याला झोप लागली होती काय? ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाविषयीचा रोष उसळून आला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सांगितले जाते. चित्रपटामुळे रोष तीव्र झाला की राज्यात मुद्दाम सगळीकडे पेटवला गेला, त्यात तेल टाकण्याचे काम कोणी केले याबाबत सरकारने आत्मचिंतन करायला हवे. दंगलीचा भडका उडाला, त्याला हवा देण्याचे काम आपल्याच सरकारमधील काही वाचाळ नेते जबाबदार आहेत. ते शांत राहिले असते तर हा वाद इतका विकोपाला गेला नसता हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवे. वातावरण बिघडल्यानंतर, दंगली पेटल्यानंतर लोकांना संयम राखण्याचे आवाहन करून उपयोग नसतो. संभाव्य शक्यता आधीच लक्षात घेऊन आपल्या बाजूने कमालीचा संयम बाळगणे आवश्यक असते. नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी मुख्य सूत्रधार फहीम शमीम खानला अटक करण्यात आली आहे.

फहीम हा ‘मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी’चा (एमडीपी) नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याने २०२४ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. फहीमच्या भाषणानंतर जमाव भडकला आणि त्यांनी मोठा हिंसाचार घडवल्याचा आरोप फहीमवर ठेवण्यात आला आहे. दंगली संदर्भात ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील अर्धे आरोपी ज्या भागात दंगल झाली त्या भागातील नाहीत म्हणे! रा. स्व. संघाने महायुती सरकारचे कान टोचले ते बरे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांच्या भूमिकेवर बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, संघाला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. राज्यात संघाच्याच विचारांचे सरकार आहे. त्यांचे मंत्री चिथावणीखोर भाषणे करतात त्याबाबत संघाने का भूमिका घेतली नाही? जेव्हा नागपूर पेटले तेव्हा संघाला शहाणपण सुचले अशी टीका पटोले यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR