27.5 C
Latur
Wednesday, October 8, 2025
Homeमहाराष्ट्रसोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार?

सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार?

सोन्याचा भाव १.२२ लाखांवरून थेट ७७,७०० पर्यंत कोसळणार?

जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने विक्रमी वाढ होत आहे. सणासुदीत दोन्ही मौल्यवान धातू नव्या उच्चांकावर पोहोचतील, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. मात्र, एका मोठ्या तज्ज्ञाने किमतीचा फुगा फुटणार असल्याचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याची तेजी टिकाऊ नाही आणि सोन्याचा भाव लवकरच १,२२,००० रुपयांवरून ७७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरू शकतो.

जागतिक रणनीतिकार अमित गोयल यांचे स्पष्ट मत आहे की, सोने आणि चांदीच्या किमती सध्या त्यांच्या ख-या मूल्यापेक्षा खूप वर पोहोचल्या आहेत. त्यांची कंपनी २.४ अब्जाहून अधिक मालमत्ता व्यवस्थापित करते. गोयल यांच्या मते, गेल्या ४० वर्षांत केवळ दोनदाच असे घडले आहे, जेव्हा डॉलर इंडेक्स कमकुवत असूनही सोने-चांदीने एवढी उत्कृष्ट कामगिरी केली. दोन्ही वेळा त्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली होती. सध्याची वाढ ही ‘गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये आतापर्यंतची सर्वांत मोठी पार्टी’ आहे.

गोयल यांनी ऐतिहासिक डेटाचा संदर्भ देत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
गोयल यांचा अंदाज आहे की, सोन्यात ३०-३५ टक्क्यांची घसरण येऊ शकते. यापूर्वी २००७-०८ आणि २०११ मध्ये मोठी तेजी आल्यानंतर सोन्याच्या किमतीत ४५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. तसे झाल्यास, भारतातील सोन्याचा भाव सध्याच्या १,२२,००० रुपयांवरून थेट ७७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो.
चांदीमध्ये सध्या सर्वाधिक उसळी दिसत असल्याने, त्यात किमान ५० टक्क्यांपर्यंत घसरण शक्य आहे. म्हणजेच, चांदीचा भाव १,५४,९०० रुपयांवरून घसरून ७७,४५० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो.

घसरणीची दोन मोठी कारणे
सध्याची तेजी एका मानसिक मर्यादेच्या जवळ पोहोचली आहे, जी सामान्यत: कोणत्याही मोठ्या तेजीच्या रॅलीचा शेवट दर्शवते. यानंतर बाजारात विक्रीचा जोर वाढेल.
अमित गोयल यांच्या अंदाजानुसार, पुढील २-३ वर्षांत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक गहन जागतिक मंदी येऊ शकते. या मंदीमुळे सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि फोटोवोल्टेइकसारख्या उद्योगांची मागणी कमकुवत होईल, ज्यामुळे चांदीच्या औद्योगिक मागणीत मोठी घट होईल.

गुंतवणुकीची खरी संधी कधी?
गोयल यांनी गुंतवणूकदारांना तात्काळ खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, सोने आंतरराष्ट्रीय बाजारात २,६०० ते २,७०० डॉलर प्रति औंस या स्तरावर आल्यास, ते पुन्हा एकदा जगातील सर्वांत सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक बनेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR