भारतीयांना पिवळ्या धातूचे म्हणजेच सोन्याचे प्रचंड वेड आहे. ‘चकाकते ते सोने नसते’ हे खरे असले तरी चकाकते ते सोनेच असते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. ‘ओल्ड इज गोल्ड’ असे उगीच म्हटले जात नाही. त्याच चालीवर ‘गोल्ड इज गोल्ड’ असे म्हणत त्याकडे धाव घेणे भारतीयांना आवडते. मग त्याचा भाव लाखाच्या घरात का जाईना, खरेदी ही होणारच! २०२३ मध्ये देशातील एकूण सोन्याची मागणी ७६१ टन होती. आयात शुल्क कपात, सोन्याच्या विक्रमी किमतीमुळे गुंतवणूक मागणीत वाढ, लग्न आणि सणांमुळे वाढलेली खरेदी यामुळे यंदा सोन्याची मागणी ५ टक्क्यांनी वाढून ती ८०२.८ टनांवर गेली. यंदा सोन्याची मागणी कमी राहील असा अंदाज आहे. प्रत्यक्षात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने लोकांना इच्छा असूनही सोने खरेदी करता येत नाही अशी स्थिती आहे. यंदाच्या वर्षात सोन्याची मागणी कमी राहील असा जागतिक सुवर्ण परिषदेचा अंदाज आहे. भारतातील सोन्याची मागणी मात्र कायम आहे. २०२५ मध्ये सोन्याची मागणी ७०० ते ८०० टन दरम्यान राहील असा अंदाज आहे. मागणी वाढलीच तर ती लग्नसराईत वाढेल.
यंदा सोन्याचा भाव ८.०७ टक्क्यांनी वाढून ८५,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. १ जानेवारी रोजी सोन्याचा भाव ७९,३९० रु. प्रति १० ग्रॅम होता. रिझर्व्ह बँक सोन्याची महत्त्वाची खरेदीदार आहे. रिझर्व्ह बँकेने २०२४ मध्ये ७३ टन सोेने खरेदी केले होते. २०२३ च्या तुलनेत ही खरेदी ४ पटीने अधिक होती. २०२३ मध्ये १६ टन सोने खरेदी करण्यात आले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क निर्णयामुळे सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला. मंगळवारी २४ तासांत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत १३१० रुपयांची वाढ झाली आणि ८४,३२० रुपयांचा आकडा झळकला. यंदाच्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील करात कोणतीही कपात झाली नाही. करकपातीमुळे गतवर्षी भाव कमी झाले होते. यंदा कराबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने मौल्यवान धातू स्वस्त होण्याची शक्यता मावळली होती. गत दोन दिवसांत सोन्याने ९० हजारांच्या घरात मजल मारली आहे. काही शहरांत सोने ८०० ते १००० रुपयांनी वधारले तर काही ठिकाणी चांदीची किंमत किलोमागे हजाराने वाढली. सध्या चांदी लाखाच्या उंबरठ्यावर आहे. बुधवारी चांदीचा भाव ९९,५०० रुपये किलो होता.
गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही सोन्याने आपली चमक दाखवली होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने ४४० रुपयांनी स्वस्त झाले होते. बुधवारी १०४० रुपयांनी सोने वधारले होते. आगामी काळातही सोने चकाकू शकते असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस ३ हजार डॉलर्स आणि देशांतर्गत बाजारात ८८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. उच्च किमती, कमकुवत आर्थिक वाढ आणि वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे अलंकारांच्या मागणीत घट झाली आहे तरीही दर वाढतच चालले आहेत. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करायचे की नाही असा प्रश्न पडला आहे. आगामी काळात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम एक लाखापर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यातच सोन्यात गुंतवणूक करणा-या सर्वसामान्यांना जोरदार झटका देणारा निर्णय सरकारने घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेची सुवर्ण योजना (सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड) बंद करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करणा-यांना स्वस्त दरात सोने खरेदी करता येत होते. आता हा देखील पर्याय उरलेला नाही. रिझर्व्ह बँकेची सुवर्ण योजना चांगलीच लोकप्रिय झाली होती. अनेकांनी या योजनेत गुंतवणूक करून स्वस्त दरात सोने खरेदी करण्याचा लाभ घेतला होता. आता ही योजनाच बंद करण्यात आल्याने कमी दरात सोने खरेदीचे सर्व पर्याय संपले आहेत. सोनं म्हणजे स्त्री धन, सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असे म्हटले जायचे. त्याची प्रचिती सोन्याचे नवनवीन उच्चांक पाहिल्यानंतर येत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत सोने ९०हजाराचा टप्पा ओलांडू शकेल असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय आणि आशियातील मार्केट सध्या अस्थिर आहे. कधी प्रचंड नफा तर कधी कोट्यवधीचा तोटा गुंतवणूकदारांना सहन करावा लागत आहे. मार्केटचा मूड कधी आणि कसा बदलेल ते सांगता येत नाही.
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलर सक्षम करण्यासाठी जाहीर केलेल्या परराष्ट्रीय धोरणांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कायम आहे. आपली अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी विविध देश मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणार आहे. मार्च २०२५ पर्यंत ५० टन सोने खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवण्याचे धोरण रिझर्व्ह बँकेने अवलंबिले आहे. त्यामुळे परकीय चलनाचा साठा वाढणार आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती बळकट करण्याचा हेतू आहे. कारण वरचेवर रुपयाची घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोन्याची खरेदी करणे अवघड आणि परवडेनासे झाले आहे. मोठ्या बँका, संस्था, सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
सोन्यातील गुंतवणूक नेहमीच मोठ्या फायद्याची ठरते. या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळतो. १९६० मध्ये १ तोळा सोन्याची किंमत फक्त ११३ रुपये होती हे आज कोणालाही खरे वाटणार नाही. अर्थात त्या काळात एक पैशालाही किंमत होती. त्यामुळे त्याकाळी ११३ रुपयांची किंमतही फार मोठी होती. आज सोन्याच्या कर्जवाटपात सुमारे १४ टक्के वाढ झाली आहे. सर्वसामान्य ग्राहक तात्पुरत्या खर्चासाठी किंवा लग्नसमारंभासाठी या प्रकारचे कर्ज घेतो. नंतर तेही फेडणे त्याला शक्य होत नाही. सहजासहजी माणूस सोने गहाण ठेवत नाही पण आज त्याच्यावर तशी वेळ आली आहे. अनेक देशांत सोने ही एक गुंतवणूक मानली जाते परंतु आपल्याकडे वाडवडिलांनी जे सोने साठवून ठेवले आहे ते तारण म्हणून ठेवून संकटावर मात करण्याची वेळ आली आहे. त्यावरून देशाचे आर्थिक आरोग्य कसे आहे याची कल्पना येते. चीनने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्याने सोन्याच्या किमती वाढत आहेत.