जळगाव : सोन्याचे दर लाखाच्या घरात पोहोचले असून सोन्याच्या दराने शुक्रवारी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आज सोन्याचे दर हे प्रति तोळा विक्रमी ९८ हजार २६२ रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटीविना आज सोन्याचे दर प्रति तोळा ९५ हजार ४०० रुपये तर जीएसटीसह सोन्याचे दर प्रति तोळा ९८ हजार २६२ रुपयांवर पोहोचले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असून परिणामी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याने ग्राहकही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. तसेच सोनं खरेदी करण्यापेक्षा सोनं मोडण्याकडे अनेक ग्राहकांचा कल अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या ट्रेडमुळे सोन्या- चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल सात ते आठ हजार रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. आज सोन्याचा दर प्रति तोळा ९८ हजार पार तर चांदीचा दर प्रति किलो लाखाच्या पार गेला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वॉरमुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असून चीनमधील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक सुरू केली आहे.