29 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeसंपादकीय विशेषसोन्याचे अर्थकारण चमकणार

सोन्याचे अर्थकारण चमकणार

राजकीय संकट, जागतिक मंदी या कारणांमुळे नागरिकांचा गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांवरचा विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केल्यास पैसे सुरक्षित राहतील, ही प्राचीन लोकभावना पुन्हा घट्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत झाल्याने २०२४ मध्ये सोन्यात गुंतवणूक करणा-यांची संख्या वाढू शकते.

रतात सोने हे नेहमीच सुरक्षित आणि फायद्याची गुंतवणूक राहिलेली आहे. संकटाच्या काळात त्याच्या मागणीत आणखीच वाढ होते. कारण सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित असण्याबरोबरच चांगला परतावा देणारी देखील आहे. महागाई दर नियंत्रित ठेवण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून २०२४ मध्ये व्याजदरात कपात करण्याची आशा, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट या कारणांमुळे सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. साधारणपणे जगभरातील सर्व देशांच्या केंद्रीय बँका फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पावलावर पाऊल टाकतात. त्यामुळे जेव्हा फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल, तेव्हा दुस-या देशांतील केंद्रीय बँका देखील व्याजदरात कपात करतील. त्यामुळे कर्ज आणि ठेवीवरच्या व्याजदरात कपात होईल. ठेवीवरच्या व्याजदरात कपात होईल, तेव्हा चांगल्या परताव्यासाठी नागरिक सोन्याकडे वळतील. आज सोन्याच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. २०२३ मध्ये सोन्यात गुंतवणूक करणा-यांना १६.४ टक्के दराने परतावा मिळाला आणि तो बँक किंवा अन्य सुरक्षित गुंतवणुकीच्या तुलनेत खूपच चांगला आहे. गेल्या दहा वर्षांत सोन्याने १०५ टक्के परतावा दिला तर जागतिक बाजारात सोन्याची किंमत ही ६३ टक्क्यांनी वाढली. जून २००८ मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही ११,९०१ रुपये होती तर जून २०१४ मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत २५,९२४ रुपये होती. त्याचवेळी जून २०१७ मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत २९,४९९ रुपये होती. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्यात अभूतपूर्व वाढ झाली आणि ही किंमत ५६,४९९ वर पोचली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही किंमत ६३,३३२ वर पोचली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औन्स २०५० डॉलर होता. सोन्यात गुंतवणूक करणा-या लोकांत वाढ होत असून ती २०२४ च्या शेवटपर्यंत दहा ग्रॅम सोन्याची किंमत ७० हजार रुपये होण्याची शक्यता आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औन्स २४०० डॉलर होईल. सोन्याच्या किमतीत गेल्या पाच दशकांतील चढ-उतार पाहता अशा प्रकारची स्थिती आगामी पाच-सहा वर्षांतही राहू शकते.

‘बोफा’ नावाच्या जागतिक संशोधन संस्थेनुसार जगभरातील केंद्रीय बँकांनी २०२२ आणि २०२३ मध्ये ब-याच प्रमाणात सोने खरेदी केले. २०२२ मध्ये प्रथमच केंद्रीय बँकांनी १ हजार टनपेक्षा अधिक सोने खरेदी केले. २०२३ मध्येही केंद्रीय बँकांनी १ हजार टनपेक्षा अधिक सोने खरेदी केले असून ते २०२१ च्या तुलनेत अडीच पट अधिक आणि २०२० पेक्षा चार पट अधिक आहे. सध्याच्या काळात जगभरातील सर्व केंद्रीय बँकांच्या राखीव कोट्यात वीस टक्के भागिदारी सोन्याची आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने ९ टन सोन्याची खरेदी केले तर पीपल्स बँक ऑफ चायनाने डिसेंबर २०२३ मध्ये २३ टन सोने खरेदी केले. ऐतिहासिक आकड्यांच्या विश्लेषणाच्या आधारावर २०२४ मध्ये जगभरातील सर्व केंद्रीय बँका आपल्या ठेवीची व्याप्ती वाढविण्यासाठी सोन्याची खरेदी करू शकतात. कोरोना काळ, जागतिक अनिश्चितता आणि जागतिक स्तरावरच्या अर्थव्यवस्थेत राहणारी संवेदनशीलता पाहता अमेरिकेसह अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती ही संथ राहिली आहे. त्याचवेळी हमास आणि इस्रायल संघर्ष, यामुळे मध्य पूर्व भागात तणावाचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी नागरिक सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

अर्थात भारत यास अपवाद आहे. कारण या ठिकाणी मंदीतही आणि अर्थव्यवस्था ही चांगली राहत असतानाही सोन्यात गुंतवणुकीचा ट्रेंड राहतो कारण भारतात प्राचीन काळापासून सोन्यात गुंतवणूक करण्याची परंपरा राहिली आहे. भारतात डिसेंबरपासून लग्नांचा हंगाम सुरू झाला आहे आणि सोन्याच्या किमतीत वाढ झालेली असतानाही नागरिक आपल्या आर्थिक स्थितीनुसार कमी- जास्त प्रमाणात सोन्याची खरेदी करत असतात आणि करत आहेत. यातही सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात सोने हे नेहमीच ‘सोने’ राहिले आहे. कारण भारतातील महिला सोन्याबाबतीत खूपच उत्साही असतात आणि हा अनुभव अनेक काळापासूनचा आहे. प्राचीन काळात तर महिलांसमवेत पुरुषही सोन्याचे दागिने घालत असत. भारताच्या राहणीमानात, सभ्यता आणि संस्कृतीत सोने सामावलेले आहे आणि त्याशिवाय जीवन अपुरे आहे.

भारतीय महिलांसाठी सोने हे केवळ दागिना नसून तिच्यासाठी स्वाभिमान, गौरवाचे प्रतीक आहे. हिंदू धर्माच्या १६ संस्कारांत अर्थात जन्म ते मृत्यूपर्यंत सोन्याला महत्त्व राहिलेले आहे. एवढेच नाही तर हिंदू धर्मातील देव-देवींना देखील सोने अर्पण करणे, सोन्याचे मुकुट घालण्याची परंपरा राहिली आहे. त्यामुळे भारतातील मंदिरात अनेक टन सोने आहे. वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलने जारी केलेल्या २०२० रोजीच्या अहवालात सुमारे ४ हजार टनपेक्षा अधिक सोने भारतातील मंदिरात असल्याचे म्हटले आहे. भारतात सोन्याची मागणी ही स्थानिक पातळीवर पूर्ण करता येत नसल्याने दुस-या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे भारताने देशांतर्गत सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी २०२२ मध्ये सर्वाधिक सोने चीनमधून आयात केले तर २०२१ मध्ये स्वित्झर्लंडकडून. अर्थात जागतिक अनिश्चिततेमुळे भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सोन्याच्या आयातीत २४.१५ टक्के घट झाली आणि ही घट ३५ अब्ज डॉलरवर आली. मात्र ही तात्पुरती स्थिती आहे.

यात बदल झाल्यानंतर भारत पुन्हा सोन्याची आयात करू शकतो.जगभरातील सोन्याच्या आयातीत स्वित्झर्लंडचा वाटा २२.६ टक्केआणि ते मूल्यांच्या आधारावर तो जगातील सर्वांत मोठा आयातदार देश आहे. त्याचवेळी १७.६ टक्के आयात चीनमधून होते अणि हा देश दुस-या स्थानावर आहे. चीन हा जगातील सोन्याच्या एकूण उत्पादनात १०.६ टक्के वाटा उचलतो. आज जगातील सर्वाधिक सोने ८१३३.४७ टन अमेरिकेत आहे आणि याबाबतीत दुस-या स्थानावर राहणा-या जर्मनीत ३३५९.०९ टन सोने आहे. सध्या महागाई अधिक असल्याने आणि शेअर बाजार वगळता बँकिंग आणि अन्य आर्थिक क्षेत्रात ठेवीवरील व्याजदर कमी राहत असल्याने तसेच भू राजनैतिक संकट, जागतिक मंदीची शक्यता या कारणांमुळे नागरिकांचा दुस-या गुंतवणुकीवर विश्वास राहिलेला नाही.

-अभिजित कुलकर्णी, अर्थघडामोडींचे अभ्यासक

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR