परभणी : प्रतिनिधी
तीन महिन्यांपूर्वी परभणीतील न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीचे कामकाज सुरू झाले आहे. या कामकाजासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. एल. आचलिया यांचे मंगळवारी (दि.४) शहरात आगमन झाले. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीलाही वेग आला आहे.
दि. १० डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर बंददरम्यान शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. आपल्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला, अशी भूमिका सोमनाथची आई व त्याच्या सर्वच कुटुंबीयांनी घेतली. या प्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची एक चौकशी समिती नेमण्यात आली. त्यानुसार दि. १५ जानेवारी २०२५ अन्वये सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.