सोलापूर :सोलापूर जिल्हाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अजितदादा गट यांची महायुती विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख सामना रंगला आहे. याशिवाय परिवर्तन महाशक्ती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यामुळे काही ठिकाणी लढत बहुरंगी झाली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अपक्ष आणि बंडखोरांचा ही तगडं आव्हान आहे.
सध्या सर्वत्र प्रचार शिगेला पोहोचला असून, आता अवघे दोनच दिवस प्रचाराला उरल्याने अनेक उमेदवारांचा रात्रंदिन प्रचार सुरू आहे. विशेषतः यंदा सोशल मिडियावर प्रचाराचा जोर दिसत आहे. दरम्यान, येत्या १८ तारखेला म्हणजेच सोमवारी या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, सध्या पदयात्रा, कॉर्नरसभा व जेवणावळीला ऊत आल्याचे चित्र चोहीकडे दिसून येत आहे. विधानसभेची विद्यमान
सदस्य संख्या २८८ इतकी असून, सत्तास्थापनेसाठी १४५ हा बहुमताचा आकडा गाठणे गरजेचे आहे. यामुळे सर्वच पक्षाचे जेष्ठ नेते आपल्या अन् मित्रपक्षाच्या सीटस् कशा वाढतील यासाठी रात्रंदिवस प्रचारात गुंग असल्याचे दिसत आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत काही मंत्र्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळेच या निवडणुकीत प्रचार करताना अनेकजण आपल्या जीभेवर ताबा ठेवूनच आपला आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. गत निवडणुकीत सर्वसामान्य जनतेची कामे नीट न केल्याने एकूण ३७ मंत्र्यांपैकी नऊ मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या नऊ मंत्र्यांमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्र्यांचा समावेश होता. यामुळे प्रत्येकजण आपण बहुमताने आणि सेफ कसे निवडून येवू हेच पाहत आहे.
सोलापूर जिल्ह्यातही महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते सध्या जोमाने प्रचारयंत्रणा राबवित आहेत. म तदारसंघातील गावन् गाव, वाडी-वस्ती, शेतकऱ्यांचे बांध, शहरातील प्रत्येक गल्लीबोळात हे नेते प्रचारासाठी फिरताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर कॉर्नरसभेद्वारे आपणच कसे श्रेष्ठ आहोत, हे समजावून सांगत विरोधकांवर टीकेची झोड उठवित आहेत.
स्टार प्रचारक आपल्या मतदारसंघात बोलावून आपल्या पक्षाने केलेली कामे आणि करावयाची कामेही सांगू लागले आहेत. प्रत्येक बुथवर जावून चर्चा करताना दिसत आहेत. एकंदरीत, सर्वच पक्षाच्या नेत्यांना आपले बळ वाढविण्याचे पडले असून, यामुळेच आता २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. फॉर्म भरल्यापासून विविध पक्षीय नेते मतदारसंघात फिरत असून, येत्या १८ तारखेलाच सायंकाळी ६ वाजता या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे.
तर २३ नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल घोषित होतील. यंदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेत येणार, कोणाच्या पदरात मुख्यमंत्री पद पडणार, हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यंदा जोरदार लढत दिसत आहे. मागील पाच वर्षात पक्ष, पदांसह सत्ताही बदलली आणि अनेक मोठे राजकीय बदल घडामोडी दिसून आल्या; यामुळे आगामी निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय चित्र कसे राहील? याबाबत नाना प्रकारचे अंदाज लोक बांधू लागले आहे. अनेक सव्हेंही समोर येत असले तरी कोणता पक्ष बलाढ्य ठरणार अन् कोण मुख्यमंत्री होणार हे येणारा काळच सांगणार आहे.
शासकीय यंत्रणा मतदान घेण्यासाठी सज्ज झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघातील ३ हजार ७३८ मतदान केंद्रांवर सर्व मतदान मशीन्स पाठविण्यात आल्या आहेत. इतकेच नाहीतर २० टक्के राखीव मशीनही तयार ठेवल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला आहे. १९ तारखेला सायंकाळपर्यंत प्रत्येक मतदारसंघापर्यंत शहर व जिल्ह्यात १६ हजार कर्मचारी पोहोचणार आहेत.
त्यांना घेवून जाण्यासाठी ५४० एसटी बसेस, १ हजारापर्यंत खाजगी वाहनांची सोय केली आहे. त्यांना आवश्यक ती स्टेशन्नरीही मतदारसंघात पोहोच झाल्याने जिल्हा प्रशासनाची मतदानासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे.