वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच ‘मोदी पॅटर्न’ अवलंबला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक करून पाकिस्तानी अतिरेक्यांना जसे सळो की पळो करून सोडले होते, तसाच कित्ता डोनाल्ड ट्रम्प यांनी गिरवला आहे. अमेरिकेच्या सैन्याने सोमालियात घुसून आयसिसच्या तळांवर हल्ले चढवले आहेत. या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी ठार झाले. विशेष म्हणजे गुहेमध्ये शिरून अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या या सर्वात मोठ्या कारवाईमुळे सोमालियात खळबळ उडाली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी एअर स्ट्राइकची माहिती दिली. आज सकाळी मी आयसिसचे सीनिअर अटॅकर आणि त्यांच्याद्वारे सोमालियात भरती करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर एअर स्ट्राइक करण्याचा आदेश दिला होता. हे दहशतवादी गुहेत लपले होते. पण आम्ही त्यांच्यावर जवळून हल्ला केला. सोमालियातील हे दहशतवादी अमेरिकाच नव्हे तर आमच्या सहका-यांसाठीही घातक होते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकन सैन्याच्या आफ्रिकन कमान द्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याचे निर्देश ट्रम्प यांनी दिले होते. त्यासाठी सोमालिया सरकारशी समन्वय साधण्यात आला होता. पेंटागॉनद्वारे दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात अनेक अतिरेकी मारले गेले आहेत, असं हेगसेथ यांनी म्हटले. तर या हल्ल्यात एकाही नागरिकाला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे पेंटागॉनने म्हटले.
दरम्यान, सोमालिया आफ्रिकन देशात झालेल्या अनेक हल्ल्याला आयसिस जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय ग्रुप्सच्या अनुसार, सोमालियामध्ये आयसिस दहशवाद्यांची संख्या शेकडोंनी आहे. यातील बहुतेक अतिरेकी हे पुंटलँडच्या बारी परिसरात कैल मिस्काट डोंगरात लपले होते.