लातूर : प्रतिनिधी
नाफेड मार्फत लातूर जिल्हयात सुरू करण्यात आलेल्या १६ हमीभाव खरेदी केंद्रावर ४७ हजार ६७१ शेतक-यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी १९ हजार २६० शेतक-यांची सोयाबीन खरेदी झाली असून २८ हजार ४११ शेतक-यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे. विशेष म्हणजे आज हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असून नोंदणीकृत शेतक-यांचे सोयाबीन खरेदी करणे शासनाच्या समोर आव्हान तयार झाले आहे.
जिल्हयात ६ लाख ९ हजार ८३३ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. या मध्ये ४ लाख ९९ हजार १३६ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला होता. सोयाबीन या पिकांच्या काढणी नंतर शेतमालाची आडत बाजारात आवक सुरू झाली. आडत बाजारात सोयाबीन या शेतमालास ४ हजार रूपयांच्या जवळपास प्रतिक्ंिवटल दर मिळत असल्याने शेतक-यांना हमीभावाच्या तुलनेत ६०० ते ७०० रूपयांचा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळाले.
शासनाने नाफेड मार्फत लातूर जिल्हयात १६ हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. या हमीभाव खरेदी केंद्रावर ४७ हजार ६७१ शेतक-यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी ३९ हजार ६९९ शेतक-यांना एसएमएस पाठवून सोयाबीन शेतमाल विक्रीसाठी घेवन येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार १९ हजार २६० शेतक-यांनी ४ लाख ९० हजार ४४१ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. तसेच जिल्हयातील २८ हजार ४११ शेतक-यांकडील सोयाबीन खरेदी अभावी अद्याप घरीच पडून आहे. नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रांच्याकडून सोयाबीन खरेदीचा कालावधी हा दि. ६ फेब्रुवारी पर्यंतच असल्याने उर्वरीत शेतक-यांकडील सोयाबीन खरेदी वेळेत होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.